India Maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव अजूनही कमी झालेला नाही. भारताने अनेक गोष्टीतून मालदीवची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मालदीव सरकारमध्ये सत्तेत आलेले मोहम्मद मुईज्जू यांना भारतापेक्षा चीनला अधिक महत्त्वाचा वाटतो. चीनचे मालदीववर भरपूर कर्ज आहे. दुसरीकडे मुईज्जू हे चीम समर्थक असल्याने ते भारत विरोधी भूमिका घेत आहेत. विरोधी पक्षात असलेले नेते यावरुन मुईज्जू यांच्यावर टीका करत आहे. भारतासोबत मैत्री खराब करु नका असं ते म्हणत आहेत. असं असताना आता मालदीवचे अर्थमंत्री मोहम्मद सईद यांनी आता नवीन वक्तव्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्या देशात ‘परकीय सैन्या’च्या उपस्थितीविरुद्धच्या भूमिकेचा बचाव केला असून ते म्हणाले की, मालदीव अजूनही भारताला आपला मित्र मानतो.
‘टीआरटी वर्ल्ड’ या तुर्की वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मालदीवचे अर्थमंत्री मोहम्मद सईद यांना मालदीव हा चीन आणि भारत या दोन्ही देशांचा मित्र असू शकतो का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले की, मालदीव हा केवळ दोन देशांचा मित्र नाही तर तो सर्व देशांचा मित्र आहे.
‘Sun.mv’ न्यूज पोर्टलनुसार, सईद म्हणाले की, “आम्ही पर्यटनावर आधारित देश आहोत आणि आमचे दरवाजे जगासाठी खुले आहेत. हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून, चीनी आणि भारतीय दोघेही मालदीवची प्रशंसा करतात. व्यापाऱ्याच्या दृष्टाने मालदीवसाठी दोन्ही बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत.
सईद पुढे म्हणाले की, मालदीव अजूनही भारताला आपला मित्र मानतो. आमचे सरकार आणि जनता येथे परदेशी सैन्याची उपस्थिती नाकारत आहे. मुइज्जू यांनी अनेक वेळा सांगितले आहे की 10 मे नंतर कोणत्याही भारतीय लष्करी जवानाला मालदीवमध्ये राहू दिले जाणार नाही.
हेलिकॉप्टर चालवण्यासाठी तैनात असलेल्या भारतीय लष्करी जवानांची पहिली तुकडी मालदीव सोडून गेली आहे. मुइज्जू म्हणाले की, इतर विमानचालन प्लॅटफॉर्मवर तैनात केलेले भारतीय सैनिकही या महिन्यात परत येतील. तिसऱ्या विमानचालन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेले भारतीय लष्करी जवान १० मेपर्यंत परतणार आहेत.
मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाल्याबद्दल सईद यांना विचारले असता, ते म्हणाले की, काही देशांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत आहे तर इतर देशांतून ती वाढत आहे. पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीत चीन कोविडच्या आधी पहिल्या क्रमांकावर होता. मात्र आता पुन्हा तेथून पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. आमच्याकडे भारतातून दररोज तासाभराने उड्डाणे येतात.”