मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग, दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती

| Updated on: Jun 27, 2023 | 6:55 PM

पश्चिम बंगालमधून एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची अचानक लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान ममता यांना दुखापत झालीय.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग, दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. खराब वातावरणामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करताना त्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान त्यांच्या पाठीला आणि गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरने जलपाईगुडी येथून उड्डाण घेतलं होतं. ममता बागडोगरा येथे जात होत्या. या दरम्यान खराब वातावरणामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सालुगाडा येथील आर्मी एअरबसवर ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. ममता बॅनर्जी यांना या इमर्जन्सी लँडिग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांचं हेलिकॉप्टर मुसळधार पावसात फसलं होतं. त्यामुळे पायलटने तातडीने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. यावेळी निर्णय घेण्यात आला की, ममता बॅनर्जी रस्ते मार्गाने बागडोगरा येथे जातील. त्यानंतर त्या कोलकाताला हवाई मार्गाने जातील.

पश्चिम बंगालमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पार पडत आहेत. येत्या 8 जुलैला यासाठी निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी प्रचारासाठी वेगवेगळ्या भागांचा दौरा करत आहेत. त्या आजदेखील पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांचा दौरा करत होत्या. या दरम्यान संबंधित प्रकार घडला.

ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये नेहमी संघर्ष बघायला मिळत असतो. भाजप पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून जोर लावला जातो. परिणामी दोन्ही पक्ष आक्रमक होतात. त्यामुळे नको त्या अनपेक्षित घटना घडतात.