कोलकाता : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी थेट पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार कोसळण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे. बीरभूम जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच 2025च्या आधीच ममता बॅनर्जी सरकार कोसळेल असा दावा अमित शाह यांनी केला आहे. तसेच पश्चिम बंगालमदून भाजपला 35 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमित शाह यांनी हा दावा केल्याने भाजप पश्चिम बंगालमध्ये मिशन लोटस राबवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ममता बॅनर्जी बंगालच्या जनतेच्या हिताचे काम करत नाहीत. त्यांना बंगालच्या जनतेचं हित साधायचं नाहीये. आपल्या भाच्याला मुख्यमंत्री बनवणं हेच त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे. मात्र, ते कदापि होणार नाही. पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये हिंसा झाली. त्यावरूनही त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला. तृणमूलच्या तृष्टीकरणाच्या राजकारणामुळे रामनवमीच्या शोभायात्रेवर हल्ला करण्याची हिंमत वाढली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपला 35 जागा द्या. राज्यात आमचं सरकार बनवा. मग बघा रामनवमीच्या शोभा यात्रेवर हल्ला करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असं शाह म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दीदीच्या कार्यकाळात पश्चिम बंगाल बॉम्ब स्फोटाचं सेंटर बनलं आहे. बीरभूममधून 80 हजाराहून अधिक डेटोनेटर आणि 27 हजार किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले आहे. एनआयएने हा साठी पकडला नसता तर पश्चिम बंगालमध्ये कितीतरी स्फोट झाले असते आणि कितीतरी लोक आपल्या जीवाला मुकले असते. त्याची गणतीच करता आली नसती, असंही ते म्हणाले. सभेपूर्वी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आंबेडकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुम्ही पश्चिम बंगालमधून 35 जागा द्या. तुम्ही तुम्हाला आश्वासन देतो की 2025नंतर राज्यात ममता बॅनर्जी सरकार राहणार नाही, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे 2026मध्ये ममता बॅनर्जी आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या.