मंदिराच्या दानपेटीत अनेक प्रकारचे दान येत असते. परंतु दानपेटीत कधी चुकून फोन पडला तर..अन् तो फोन आयफोन असल्यावर…मग मंदिर संस्थानकडून तो परत मागितला जाणारच. यासंदर्भात आगळावेगळा किस्सा घडला आहे. तामिळनाडूतील तिरुपोरूरमधील अरुलमिगु कंदास्वामी मंदिरातील ही घटना आहे. या मंदिरातील दानपेटीत एका भाविकाचा चुकून आयफोन पडला. त्या भाविकाने तो परत मागितला. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून आता ही ईश्वराची संपत्ती असल्याचे सांगत फोन देण्यास नकार दिला.
विनायगपुरममधील निवासी दिनेश यांनी सांगितले की, मंदिराच्या दानपात्रात (हुंडी) चुकून iPhone पडला. तो परत मागितल्यावर तामिळनाडूतील हिंदू धार्मिक आणि धर्मस्थ विभागाने सांगितले की, मंदिराच्या दानपेटीत जे काही येते ते ईश्वराची संपत्ती आहे. आता तो फोन मंदिराची संपत्ती झाली आहे.
दिनेश हे मंदिरातील हुंडीत दान टाकत होते. त्यावेळी त्यांच्याकडून चुकून आयफोनसुद्धा दानपेटी पडला. आपल्या चुकीची जाणीव होताच त्यांनी प्रशासनाला संपर्क केला आणि आयफोन परत देण्याची विनंती केली. मंदिराची हुंडी उघडल्यावर त्यात आयफोन मिळाला. मंदिर प्रशासनाने दिनेश यांना सांगितले की, ते फोनचा डेटा घेऊ शकतात. परंतु फोन त्यांना परत मिळणार नाही. दिनेश यांनी डेटा घेण्यास नकार दिला. त्यांनी फोनच परत देण्याची मागणी केली.
आयफोनचे हे प्रकरण संबंधित खात्याचे मंत्री पी के शेखर बाबू यांच्याकडे गेले. त्यांनी म्हटले, हुंडीत जे काही अर्पण केले जाते, ते ईश्वराचे होते. मग अर्पण केलेली वस्तू चुकून केली असली तरी ती ईश्वराच्या खात्यात जाते. मंदिराच्या नियमानुसार हुंडीत टाकलेली वस्तू परत मिळत नाही. तसेच मंत्री बाबू यांनी पुढे म्हटले की, या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच भाविकाला काही भरपाई देता येईल का? त्याचाही विचार केला जाईल. 1975 मधील हुंडी नियमानुसार हुंडीत टाकलेली वस्तू किंवा रोकड परत करता येत नाही. ती मंदिराची संपत्ती समजली जाते.
मे 2023 मधील अलप्पुझामधील एस संगीता या महिलेची 1.75 ग्रॅम सोन्याची चेन पलानीतील प्रसिद्ध श्री धनदायुथपाणी स्वामी मंदिरातील हुंडीत पडली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर ते स्पष्टही झाले होते. परंतु चेन महिला परत करण्यात आली नाही. तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मंदिर ट्रस्ट बोर्डच्या अध्यक्षांनी आपल्या खर्चाने तिला नवीन चेन बनवून दिली.