रायपूर : ‘विषय- बायको मिळवून देणेबाबत’… राजस्थानच्या दौसा येथील एका तरुणाने तहसीलदाराला बायको मिळवून देण्यासाठी पत्र लिहिलं आहे. विशेष म्हणजे तहसीलदारानेही या पत्रावर रिमार्क दिला आहे. या तरुणाच्या समस्यांचं समाधान करा, असा शेरा या पत्रावर तहसीलदाराने मारला आहे. आता या तरुणाचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरातील काम करणं आता अवघड जात आहे. त्यामुळे घरात काम करण्यासाठी पत्नी हवी आहे, असंही या तरुणाने पत्रात म्हटलं आहे.
या तरुणाला कशी बायको पाहिजे याचं वर्णन त्याने या पत्रात दिलं आहे. त्याला चार गुणांनी संपन्न अशी पत्नी हवी आहे. माझी भावी बायको जाडी नको. ती सडपातळ असावी. शिवाय गोरीगोमटी असावी. साधारण 30 ते 40 या वयोगटातील ती असावी. त्यासोबत तिला घरातील कामे करता आली पाहिजे, अशा मागण्या त्यानने या पत्रात नमूद केल्या आहेत. घरात एकटं राहून कंटाळा आल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
या तरुणाने तहसीलदारांना हे पत्र पाठवलं. हे पत्र मिळताच तहसीलदाराने पोलीस पाटलाला यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या तरुणाच्या समस्येचं सामाधान शोधा, असं त्यात म्हटलं आहे. पोलीस पाटलाकडे हे पत्र आल्यानंतर त्यानेही हे पत्र पंचायत समितीकडे पाठवून उचित कार्यवाही करण्यास सांगितलं आहे. 3 जून रोजी गांगदवाडी महागाई राहत कँम्पच्यावेळी हे पत्र आल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियावर आणखी एक अर्ज व्हायरल होत आहे. त्यात या तरुणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंचायत स्तरावर एक समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या टीममध्ये सचिव, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश असावा असं म्हटलं आहे. ही टीम स्थापन केल्याने तरुणाला तात्काळ दिलासा मिळेल. त्याला लवकर पत्नी मिळेल, असं त्यात म्हटलं आहे. या पत्राखाली सही करणअयात आली आहे. त्यावर 3 जून 2023 लिहिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या व्हायरल पत्राची टीव्ही9 पुष्टी करत नाही.