मणिपूरमध्ये बंडखोरांनी हल्ला केला आहे. यात CRPF चे दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेले दोन्ही जवान 128 बटालियनचे होते. नारानसेना भागात ही घटना घडली. कुकी बंडखोरांनी हा हल्ला केला. मणिपूरच्या नारानसेना भागात मध्यरात्रीच्या सुमारास कुकी बंडखोरांनी हल्ला केला. यात CRPF चे दोन जवान शहीद झाले अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली. CRPF च्या 128 व्या बटालियनचे हे जवान होते. मणिपूरच्या बिष्णुपुर जिल्ह्यातील नारानसेना भागात ही बटालियन तैनात आहे.
मणिपूर मागच्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये होरपळत आहे. मैतेई आणि कुकी समुदायात सुरु झालेला हा हिंसाचार संपायच नाव घेत नाहीय. इथे गोळीबार आणि हत्या झाल्याच्या बातम्या येत असतात. तीन दिवसांपूर्वीच मणिपूरमध्ये गोळीबार झाला होता. पश्चिमी इंफाळच्या अवांग सेकमई आणि शेजारच्या लुवांगसंगोल गावात दोन गुटांमध्ये हिंसक झडप झाली होती.
मणिपूरमध्ये आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू?
यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आली नव्हती. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा पथकांची तैनाती करण्यात आली. मणिपूरमध्ये हिंसाचारात आतापर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. हजारो लोक बेघर झालेत. हजारो लोकांनी पलायन केलं.
अजूनही पूर्णपणे नियंत्रण नाही
मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत गोळीबार, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मैतेई-कुकी वाद अजूनही मिटलेला नाही. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार रोखण्यासाठी अनेक पावल उचलण्यात आली. पण अजून या घटना नियंत्रणात आलेल्या नाहीत.