नवी दिल्ली : मणिपूरच्या घटनेमुळे प्रत्येकजण हैराण आणि त्रस्त आहे. जातीय हिंसाचाराची ही आग इतकी पसरलीय की, त्यामध्ये सर्व मर्यादा पार झाल्या आहेत. 4 मे रोजी भयानक घटना घडली. आता त्याचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेमुळे देश हादरलाय. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. आता जवळपास अडीच महिन्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारच्या बेजबाबदारपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतय. कारण जून महिन्यात FIR दाखल झाल्यानंतर काही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वक्तव्यातूनही किती मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणा झालाय ते स्पष्ट होतय. “अशा प्रकारच्या 100 एफआयआर झाल्या आहेत. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला, तेव्हा दखल घेण्यात आली” असं बिरेन सिंह म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती
एन. बिरेन सिंह यांनी एका खासगी चॅनलला इंटरव्यू दिला. “व्हिडिओ बद्दल कालच समजलं. एकाच प्रकारचे 100 एफआयआर झालेत. अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडलेत. त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जे झालं, ते चुकीच आहे. या प्रकरणात एकाला अटक झालीय. आणखी कठोर कारवाई करण्यात येईल” असं बिरेन सिंह म्हणाले.
अत्यंत घृणास्पद कृत्य
या प्रकरणात एकाला अटक झाल्यानंतर मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी गुरुवारी सकाळी टि्वट केलं. “हे अमानवीय कृत्य सहन करणाऱ्या त्या दोन महिलांसोबत माझ्या संवेदना आहेत. पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेत कारवाई केली आहे. या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल. सर्व दोषींविरोधात कठोर कारवाई होईल. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा विचार होईल. अशा घृणास्पद कृत्यांना आपल्या समाजात स्थान नाही”
My hearts go out to the two women who were subjected to a deeply disrespectful and inhumane act, as shown in the distressing video that surfaced yesterday. After taking a Suo-moto cognisance of the incident immediately after the video surfaced, the Manipur Police swung to action…
— N.Biren Singh (@NBirenSingh) July 20, 2023
कसं घडलं हे?
मणिपूरच्या कांगकोपी जिल्ह्यात ही घटना झाली. गावावर उग्र जमावाने हल्ला केला. महिलांसोबत गैरवर्तन केलं. 4 मे रोजीच्या घटनेवर 20 जुलैला कारवाई झाली. पोलिसांनी एका दोषीला अटक केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 19 जुलैला कारवाई केली, म्हणून पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतय.
कुठल्या दोन समाजांमध्ये संघर्ष
4 मे रोजी घडलेल्या या घटनेवर 21 जूनला एफआयआर नोंदवण्यात आला. 12 कलमांतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये नगा-कुकी आणि मैतइ समुदायामध्ये संघर्ष सुरु आहे. यात 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.