नवी दिल्ली : अबकारी धोरण घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्यावर आयपीसीच्या कलम 120-B आणि 47 -Aनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटकेमागे दिल्लीतील बडे व्यावसायिक दिनेश अरोडा यांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. दिनेश अरोडा हे सिसोदिया यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकरणात ते सरकारी साक्षीदार बनले आहेत. त्यामुळे सीबीआयला थेट उपमुख्यमंत्र्यांच्या कॉलरला हात घालता आला आहे. मात्र, या अटकेमुळे दिल्ली हादरून गेली आहे.
दिल्लीतील रेस्टॉरंट इंडस्ट्रीमधील एक महत्त्वाचं नाव म्हणून दिनेश अरोडा यांच्याकडे पाहिलं जातं. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अरोडा यांनी दिल्ली कोर्टात याचिका दाखल करून सरकारी साक्षीदार बनण्याची विनंती केली होती. या प्रकरणातील सर्व माहिती देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. माझ्यावर कुणाचाच दबाव नाही. सीबीआयच्या सांगण्यावरूनही मी हे करत नाहीये, असं या याचिकेत अरोडा यांनी म्हटलं होतं.
सीबीआयने जी पहिली एफआयआर दाखल केली होती. त्यात दिनेश अरोडा यांचं नाव होतं. एफआयआरमध्ये राधा इंडस्ट्रीडचे डायरेक्रट दिनेश अरोडा यांच्याशिवाय रिटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित अरोडा आणि अर्जुन पांडे यांचंही नाव होतं. हे सर्व लोक उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अत्यंत जवळचे आहेत.
दिनेश अरोडा दिल्लीतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रेस्टॉरंट इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे. दिनेश यांनी 2009मध्ये रेस्टॉरंट इंडस्ट्रीला सुरुवात केली. दिल्लीच्या हौज खासमध्ये त्यांनी पहिलं कॅफे सुरू केलं. त्यानंतर एकामागोमाग एक दिल्लीतील अनेक भागात त्यांनी रेस्टॉरंट सुरू केलं.
दिनेश अरोडा यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ते चीका दिल्ली, अनप्लग्ड कोर्टयार्ड आणि ला रोका एरोसिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याशिवाय ते नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या चॅप्टर हेडचे सदस्यही आहेत.
अरोडा यांनी जुलै 2018मध्ये इस्टमन कलर रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमेटडची सुरुवात केली होती. त्यांना खाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांचा हा छंद म्हणजे रेस्टॉरंट इंडस्ट्री असल्याचं सांगितलं जातं. सीबीआयच्या नुसार अरोडा हे राधा अरोडा इंडस्ट्रीजचे डायरेक्टरही आहेत.
लॉकडाऊनच्या काळात दिनेश अरोडा पहिल्यांदा चर्चेत आले. या काळात त्यांनी गरजवंतांना अन्न वाटप केलं होतं. त्यांनी घरातच पॅकेजिंग यूनिट विकसित केले होते. घरातूनच अन्न पॅक करून ते गरीबांमध्ये वाटप करायचे.