Manmohan Singh Net Worth: माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. गुरुवारी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मनमोहन सिंग हे आपल्या मागे कोट्यवधी रुपयांची संपत्ती सोडून गेले आहे.
मनमोहनसिंग यांनी सन 2018 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या संपत्तीची आणि कर्जाची माहिती दिली होती. त्यानुसार मनमोहन सिंग यांची संपत्ती 15.77 कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची 2018-19 मध्ये उत्पन्न 90 लाख रुपये होते.
माईनेता वेबसाइटने मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार त्यांच्याजवळ 30 हजार रुपये रोकड आहे. तसेच 3.86 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यांचा दिल्ली आणि चंडीगढमध्ये एक-
एक फ्लॅट आहे. तसेच मनमोहन सिंग यांच्यावर काहीच कर्ज नाही.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. मनमोहन सिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.