Ayodhya ram mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला अयोध्येत भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अयोध्येत श्री रामांचा जन्म झाला होता. त्यामुळे तेथेच राम मंदिर असावे अशी राम भक्तांची शेकडो वर्षापासून मागणी होती. आता याच जन्मभूमीवर रामाचे भव्य मंदिर बनून तयार आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध तयारी करण्यात येत आहे. प्राणप्रतिष्ठानिमित्त श्री राम मंदिरात प्रसाद म्हणून ७ हजार किलोचा हलवा तयार केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रसाद तयार होत असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे हा प्रसाद मराठमोळा व्यक्ती तयार करणार आहे.
महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी विशू मनोहर अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी प्रसाद तयार करत आहेत. मनोहर विष्णू यांच्या नावावर 12 जागतिक विक्रम आहेत. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी प्रसाद तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
श्री राम मंदिराच्या उद्घाटनावेळी 7000 किलोचा हलवा प्रसाद म्हणून तयार केला जात आहे. हा प्रसाद दीड लाख राम भक्तांना दिला जाणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हलवा बनवण्याची जबाबदारी नागपूरच्या विष्णू मनोहर यांच्यावर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हलवा तयार करण्यासाठी नागपुरातून तवाही आणला आहे. सुमारे 1400 किलो वजनाच्या या पॅनमध्ये भगवान रामाचा प्रसाद तयार केला जातो आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हलवा बनवण्यासाठी 900 किलो रवा, 1000 किलो साखर, 2500 लिटर दूध, 300 किलो ड्रायफ्रूट्स, 1000 किलो तूप आणि 2500 लिटर पाणी वापरण्यात येत आहे. हलवा बनवण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हा हलवा लोकांमध्ये वाटला जाणार आहे.
विष्णू मनोहर यांनी आतापर्यंत 12 विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. अलीकडेच त्यांनी 285 मिनिटांत भातासह 75 प्रकारचे पदार्थ तयार करून विश्वविक्रम केला आहे. विष्णू मनोहर हे विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यात माहीर आहेत.