मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील बाफलियाज येथे एक जवान शहीद झाला. शहीद झालेल्या जवानाचे नाव गौतम कुमार आहे. ते रायफलमन होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या घरी गौतमचं लग्न ठरल्यामुळे आनंदाचं वातावरण होतं आणि घरातील लोकं त्याच्या लग्नाच्या तयारीत होते. परंतू त्याआधीच कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. 30 सप्टेंबर रोजी गौतमचे लग्न ठरले होते आणि 11 मार्चला त्याचे लग्न होणार होते. घरात सगळे आनंदी होते पण या दरम्यानच दुखाची बातमी आली.
शहीद गौतम कुमार यांच्या भावाने त्यांच्याबद्दल माहिती दिली. राहुल कुमार यांनी म्हटले की, 2014 मध्ये गौतम कुमार लष्करात भरती झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून ते पुंछ सेक्टरमध्ये तैनात होते.
1 डिसेंबर रोजी ते आपल्या घरी आले होते. त्यानंतर सुट्ट्या संपवून 16 डिसेंबरला ते पुन्हा कर्तव्यावर गेले. सप्टेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. संपूर्ण कुटुंब लग्नाची जय्यत तयारी करत होते. पण त्याआधीच शोककळा पसरली. गुरुवारी रात्री लष्कराच्या अधिकाऱ्यांनी गौतम कुमार शहीद झाल्याची बातमी सांगितली. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
गौतम कुमार यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. गौतम कुमार हे चार भावंडे आहेत. ज्यामध्ये गौतम कुमार हे सर्वात लहान होते. त्यांना दोन बहिणी आहेत. त्यांचा विवाह झाला आहे. भाऊ राहुल कुमार देखील शिक्षण विभागात कार्यरत आहेत.
गौतम कुमार शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण गावावर एकच शोककळा पसरली आहे. शहीद झाल्याची बातमी कळताच लोकं त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी येत आहे.