आता एवढंच ऐकायचं बाकी होतं… म्हणे, मांस खाल्ल्याने… आयआयटीच्या डायरेक्टरने तोडले तारे

| Updated on: Sep 08, 2023 | 8:33 AM

आयआयटी मंडीचे डायरेक्टर लक्ष्मीधर बेहरा एका वेगळ्याच वादात अडकले आहेत. त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्यावर देशभरातून टीका होत आहे. विशेष म्हणजे बेहरा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केलं होतं.

आता एवढंच ऐकायचं बाकी होतं... म्हणे, मांस खाल्ल्याने... आयआयटीच्या डायरेक्टरने तोडले तारे
Laxmidhar Behera
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मंडी | 8 सप्टेंबर 2023 : भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली आहे. भारताने चंद्रावर पाऊल ठेवून आपण विज्ञानक्षेत्रात मोठी गरूड झेप घेतल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. एकीकडे भारत विज्ञानक्षेत्रात मोठी प्रगती करत असतानाच दुसरीकडे आयआयटी सारख्या महत्त्वाच्या संस्थांमधील प्रमुख लोकच काहीही बरळताना दिसत आहेत. आयआयटीचे संचालक प्रा. लक्ष्मीधर बेहरा यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांचीच कान टवकारले आहेत. एवढेच नव्हे तर बेहरा यांचं हे विधान विज्ञानाला अजिबात धरून नसल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. असा व्यक्ती आयआयटीच्या प्रमुखपदावर कसा? असा सवालही या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.

आयआयटीच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. लक्ष्मीधर बेहरा यांनी हे विधान केलं आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती मिळाली नाही. पण बेहरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बेहरा यांच्या या व्हिडीओवर आयआयटीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण हिमाचल प्रदेशात काही दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे हिमाचलमध्ये मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झालं. त्यामुळे घरेदारे आणि इमारती कोसळल्या आहेत.

काय म्हणाले बेहरा

लक्ष्मीधर बेहरा हे आयआयटी मंडीचे संचालक आहेत. या व्हिडीओत ते विद्यार्थ्यांना मांस न खाण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशात लोक जनावरांना मारून त्यांचं मांस खात आहे. त्यामुळेच हिमाचलमध्ये भुस्खलन होत आहे. नैसर्गिक प्रकोप होत असल्याचा दावा बहेरा यांनी केला आहे. लोकांना जर चांगला माणूस बनायचं असेल तर त्याने मांस खाणे बंद केलं पाहिजे, असं आवाहन करतानाच बेहरा हे यावेळी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ देतानाही दिसत आहेत. प्राण्यांची हत्या करणं निसर्गाच्या विरुद्ध आहे. प्राण्यांची हत्या होत असल्यानेच हिमाचलमध्ये ढगफुटी होत आहे, असे तारेही त्यांनी तोडले आहेत.

 

काहीच माहिती नाही

या व्हिडीओबाबत आयआयटी मंडीच्या मीडिया सेलशी चर्चा करण्यात आली. पण बेहरा यांनी कोणत्या कार्यक्रमात हे विधान केलं ते माहीत नसल्याचं मीडिया सेलचं म्हणणं आहे. मांस न खाण्याचा सल्ला बेहरा यांनी दिला आहे. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, असंही मीडिया सेलचं म्हणणं आहे.

यापूर्वीही वादात

आयआयटीचे डायरेक्टर बेहरा हे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. मंडी डायरेक्टर म्हणून येण्यापूर्वी त्यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी आपल्या घरातून भूत पळवून लावल्याचा दावा केला होता. चेन्नईतील एका मित्राच्या घरातून मंत्रोच्चार करून भूत पळवून लावल्याचाही त्यांचा दावा होता. त्यांनी आपण भूतप्रेतांवर विश्वास ठेवत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ते वादात सापडले होते.