मुंबई : मोदी सरकारच्या धोरणावर वेळोवेळी टीका करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा स्फोटक वक्तव्य केलं आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारला चांगलंच घेरलंय. “कुत्री मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश दिला जातो. मात्र शेतकरी आंदोलनात सहाशे शेतकरी शहीद झाले, तरी दिल्लीचे नेते लोकसभेत 600 शेतकऱ्यांचा प्रस्ताव मंजूर करु शकले नाहीत,” असा घणाघाती हल्ला मलिक यांनी केलाय. ते जयपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
“मी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं. देशात एवढे मोठे आंदोलन आतापर्यंत कधी झाले नाही. या आंदोलनात सहाशे लोक शहीद झाले. कुत्रीजरी मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश दिला जातो. पण सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव लोसभेत मंजूर करु शकले नाहीत,” असे म्हणत सत्यापाल मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
मागील अनेक दिवसांपासून सत्यपाल मलिक मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करताना दिसतायत. शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार तसेच काश्मीमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वी तिखट भाष्य केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य तसेच अंबानी यांच्या फाईल्स मंजूर करण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. “काश्मीरला गेल्यानंतर माझ्यासमोर दोन फायली मंजुरीसाठी आणल्या गेल्या. एक अंबानी आणि दुसरा आरएसएसशी संबंधित होता, जो मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन (पीडीपी-भाजप) सरकारमध्ये मंत्री होता. तुम्हाला प्रत्येक फाईल क्लिअर करण्यासाठी 150-150 कोटी रुपये मिळतील, असे मला सचिवाने सांगितले होते,” अशी माहिती मलिक यांनी 22 ऑक्टोबर रोजी एका भाषणादरम्यान दिली होती.
पाहा व्हिडीओ :
मलिक यांनी गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला होता. “गोव्यातील भाजप सरकार कोव्हिड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकले नाही. मी हे खूप विचारपूर्वक बोलतोय आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला. गोवा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मला गोव्याच्या राज्यपालपदावरुन हटविण्यात आलं. हकालपट्टी झाली. मी लोहियावादी आहे, चरणसिंग यांच्यासोबत मी काम केलं आहे, मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. गोवा सरकारची घरोघरी रेशन वाटपाची योजना अव्यवहार्य होती. सरकारला पैसे देणाऱ्या कंपनीच्या सांगण्यावरून हे केले गेले. माझ्याकडे काँग्रेससह इतर पक्षांनी चौकशीशी मागणी केली होती. मी या प्रकरणाची चौकशी करून पंतप्रधानांना माहिती दिली,” असं सत्यपाल मलिक यांनी 26 ऑक्टोबर रोजी सांगितलं होतं.
दरम्यान, आता मलिक यांनी शेतकरी आंदोलनावरुन थेट दिल्लीवर निशाणा साधल्यामुळे वातावण चांगलेच तापले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
इतर बातम्या :
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पालखी मार्गांचे भूमिपूजन, कसा असेल सोहळा?
Lakhimpur Kheri Voilence: सुप्रीम कोर्टात उद्या लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुनावणी
(meghalaya governor satyapal malik support farmers protest criticizes central government)