पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी नेतन्याहू हे जगातील सर्वात मोठे दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, मेहबूबा मुफ्ती म्हणतात की, इस्रायलचे पंतप्रधान जर्मन हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर आहेत. हिटलरने ज्यूंना मारण्यासाठी गॅस चेंबर बांधले. तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी पॅलेस्टाईन आणि लेबनॉनला गॅस चेंबरमध्ये बदलले आहे. ते हजारो लोकांचा बळी घेत आहेत.
माजी मुख्यमंत्री मुफ्ती म्हणाल्या की, ‘हिटलरने लोकांना मारण्यासाठी गॅस चेंबर्स बनवले होते. पण नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईन आणि लेबनॉनला गॅस चेंबर बनवले आहे. जिथे हजारो लोकांचे बळी घेतला जात आहे. महात्मा गांधींच्या काळापासून आम्ही पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे आहोत. अशा शासनाशी संबंध ठेवणे आणि लोकांना मारण्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे आणि ड्रोन पुरवणे हा चुकीचा निर्णय आहे.
हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह यांना शहीद म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्यावर भाजपने टीका केली आहे. त्यावर मेहबुबा म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने या हत्येविरोधात देशातील आक्रोश पाहिला पाहिजे. पीडीपी प्रमुख म्हणाल्या की, ‘भाजप मला काय सांगेल? हे तेच लोक आहेत जे कठुआ येथील आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे होते. ते दोषी आज शिक्षा भोगत आहेत. बलात्काऱ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल मला त्यांच्या दोन मंत्र्यांना काढावे लागले.
पुढे म्हणाल्या की, ‘पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी नसराल्लाह यांचा प्रदीर्घ संघर्ष त्यांना (भाजप) काय माहिती? काश्मीर, लखनौ आणि देशाच्या इतर भागांतून किती लोक बाहेर पडतात आणि शहीदांच्या स्मरणार्थ घोषणा देत आहेत, हे त्यांनी पाहावे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे.तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान 25 सप्टेंबर रोजी झाले होते.