महबूबा मुफ्ती थोडक्यात बचावल्या, एस्कॉर्ट गाडीला अपघात; नेमकं काय घडलं?

| Updated on: May 18, 2024 | 9:17 PM

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या एस्कॉर्ट गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला आयटीबीपीचा जवान जखमी झाला आहे. या अपघातात महबूबा मुफ्ती थोडक्यात बचावल्या आहेत. जखमी जवानाला रुग्णालयात पाठवल्यानंतर मुफ्ती पुढच्या दौऱ्याला निघाल्या.

महबूबा मुफ्ती थोडक्यात बचावल्या, एस्कॉर्ट गाडीला अपघात; नेमकं काय घडलं?
accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पीडीपी नेत्या आणि माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या एस्कॉर्ट गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात महबूबा मुफ्ती बचावल्या असल्या तरी आयटीबीपीचा एक जवान जखमी झाला आहे. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील उरनहॉल बिजबेहरा परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघाताची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तात्काळ चौकशी सुरू केली आहे. मात्र, हा अपघात किती मोठा होता याची माहिती अजून आलेली नाही.

महबूबा मुफ्ती या अनंतनाग शहरातून बिजबेहराला जात होत्या. तेव्हा एस्कॉर्ट गाडी उरनहॉल इथे दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघातात आयटीबीपीचा एक जवान जखमी झाला. त्याला तात्काळ एसडीएच बिजबेहारा येथील रुग्णालयात नेले. तिथून त्याला जीएमसी अनंतनाग येथे रेफर करण्यात आलं. महबूबा मुफ्ती सुरक्षित असून त्या पुढील दौऱ्याला गेल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

काही काळ ताफा थांबला

हा अपघात घडल्यानंतर महबूबा मुफ्ती यांचा ताफा काही काळ घटनास्थळी थांबला होता. जखमी जवानाला रुग्णालयात पाठवल्यानंतर माजी मुख्यमंत्री मुफ्ती या पुढच्या दौऱ्याला निघाल्या. हा अपघात किती मोठा होता? हा अपघात कसा झाला? एस्कॉर्ट गाडीचा अपघात झाला कसा? याची माहिती मिळू शकली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते अधिक तपास करत आहेत. महबूबा मुफ्ती यांच्या ताफ्यातील एक दोन वाहनांचं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे.

प्रचार रोखण्याचा आरोप

दरम्यान, महबूबा मुफ्ती यांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. काश्मीरमध्ये लोकशाहीचे धिंडवडे काढण्यात आले आहेत. एका उमेदवाराच्या प्रचार प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. इंजीनिअर रशीद यांचे मुख्य प्रचारक शौकत पंडित यांना चुगल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. आम्हाला प्रचार करण्यापासून रोखण्याचं काही लोकांचं षडयंत्र आहे. त्यांच्याच इशाऱ्यावरून हे काम करण्यात आलं आहे. प्रॉक्सी उमेदवाराची मदत करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. काश्मीरमध्ये लोकशाही राहिलेलीच नाही, असा आरोप मुफ्ती यांनी सोशल मीडियातून केला आहे.