इंफाळ | 29 जुलै 2023 : मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरू आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. संसदेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. विरोधकांनी गेल्या चार दिवसांपासून मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारला संसदेत चांगलंच घेरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची प्रचंड कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे आता मणिपूरच्या महिलाच रस्त्यावर उतरल्या आहेत. आपल्याव पुन्हा बलात्कार होऊ नये म्हणून या महिलांनी कंबर कसली आहे. निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी या महिलांचा प्रयत्न सुरू आहे.
मणिपूरमधील महिला हातात मशाल घेऊन सुरक्षा रक्षकांसह रस्त्यावर उतरल्या आहेत. मणिपूरमधील महिलांच्या या आंदोलनाला मीरा पैबी असं म्हटलं जातं. या आंदोलनात महिला रस्त्यावर उतरतात. त्यांच्या हातात मशाल असते. इंफाळमध्ये महिला रात्री रस्त्यावर उतरल्या आहेत. घरातील लोकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी त्या रस्त्यावर उतरल्या आहेत.
मीरा पैबी आंदोलनाला मणिपूरचा टॉर्च बेअरर म्हटलं जातं. कारण महिला हातात मशाल घेऊन आंदोलन करतात. या आंदोलनात मैतेई समाजातील महिला सामील होतात. या महिला नैतिक शक्तीचं प्रतिनिधीत्व करतात. स्त्रीवादी मणिपूर समाजात या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे. मणिपूरमधीली सर्व आंदोलनात या महिला संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. एखाद्या गोष्टीवर तोडगा निघत नसेल, सरकार ऐकत नसेल तर या महिला नग्न आंदोलन करण्याची धमकीही देताता. अशा धमक्यांमुळे सुरक्ष दल आणि लष्कराचे जवानही हतबल होतात.
इंग्रजांच्या काळात 1904मध्ये कर्नल मॅक्सवेल यांनी आदेश काढला होता. प्रत्येक पुरुष 30 दिवसात 10 दिवस मोफत काम करेल, असा हा आदेश होता. त्या आदेशाविरोधात मीरा पैबी ग्रुप रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे कर्नल मॅक्सेवल यांना आपला आदेश मागे घ्यावा लागला होता, 1939मध्ये राजाच्या आर्थिक धोरणा विरोधातही या ग्रुपने आंदोलन केलं होतं. 2004मध्ये मनोरमा देवी रेप केसनंतर मीरा पैबी ग्रुपच्या महिलांना नग्न आंदोलन केलं होतं. इंफान सिटीपर्यंत नग्न मार्च काढला होता.
3 मेपासून मणिपूरमध्ये हिंसा भडकली आहे. मणिपूरमध्ये दोन समुदाय एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. प्रचंड जाळपोळ सुरू आहे. हिंसा सुरू आहे. माणसांना मारलं जात आहे. सरकारी मालमत्तांचं नुकसान केलं जात आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये तणाव आणि दहशतीचं वातावरण आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. पण सरकारकडून मणिपूरची हिंसा रोखण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीये.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी तीन दिवस मणिपूरमध्ये राहिले होते. त्यांनी हिंसा करणाऱ्या दोन्ही समुदायाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. मात्र, त्यानंतरही मणिपूरची हिंसा काही थांबलेली नाही. मणिपूरमध्ये 35 हजार अतिरिक्त जवाना तैनात करण्यात आले आहेत.