Michaung Cyclone: तमिळनाडूत रस्ते झाले जलमय, विमान सेवा ठप्प; 8 लोकांचा मृ्त्यू

| Updated on: Dec 05, 2023 | 6:47 PM

Michaung Cyclone :

Michaung Cyclone: तमिळनाडूत रस्ते झाले जलमय, विमान सेवा ठप्प; 8 लोकांचा मृ्त्यू
chennai flood
Follow us on

Michaung Cyclone : तामिळनाडूमध्ये मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर आला आहे. चेन्नई आणि राज्यातील इतर प्रमुख शहरातील मुख्य रस्ते आणि भुयारी मार्ग पाण्याखाली गेले आहेत. चेन्नईच्या अनेक भागात अनेक वर्षांनी इतका पाऊस झाला. याचा विमानसेवेला देखील सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी चेन्नई विमानतळावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पाणी साचल्यामुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी चक्रीवादळग्रस्त भागांची पाहणी केली. बचाव कार्य सुरु आहे. चेन्नईतील कन्नप्पर थिडाल येथे बचाव शिबीर उभे करण्यात आले आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्यभरात सध्या 162 मदत केंद्रे सुरू आहेत, त्यापैकी 43 चेन्नईत आहेत. राज्याच्या राजधानीत कार्यरत 20 स्वयंपाकघरांमधून अन्न पुरवठा केला जात आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी बंद करण्यात आलेल्या चेन्नई विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, विमानतळ कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विशाखापट्टणमची 23 उड्डाणे रद्द

बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या तीव्र चक्रीवादळामुळे मंगळवारी विशाखापट्टणम विमानतळावरील कामकाजावर परिणाम झाला आणि 23 उड्डाणे रद्द करावी लागली. खराब हवामानामुळे उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, विजयवाडा, तिरुपती आणि चेन्नई सारख्या गंतव्यस्थानांना जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

विमानतळावर आपत्कालीन सेवा

प्रवाशांना अधिक माहितीसाठी एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अधिका-यांनी सांगितले की, विमानतळावर आपत्कालीन सेवा सुरू आहेत. मिचॉन्गच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचा संपूर्ण किनारी प्रदेश हाय अलर्टवर आहे. या भागात ताशी 90-100 किमी ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. किनारपट्टीवर एक ते दीड मीटर उंचीच्या भरतीच्या लाटा दिसू शकतात. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.

कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम

पावसामुळे 1750 हून अधिक एमएसएमई कंपन्यांना याचा फटका बसला असून 7000 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चेन्नईजवळील फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन कारखान्यांमध्येही आयफोनचे उत्पादन थांबले आहे. अशोक लेलँड आणि TVS मोटरचे होसूर येथे प्लांट आहेत, MRF चे चेन्नई येथे 3 प्लांट आहेत. बिर्लासॉफ्ट, एक्सेंचर, एचसीएल टेक आणि इन्फोसिस सारख्या अनेक आयटी कंपन्यांची चेन्नईमध्ये मोठी कार्यालये आहेत.