जॉब सेक्युरिटी, भरघोस पगार आणि इतर सोयीसुविधा यामुळे अनेक तरुणांचा कल हा शासकीय नोकरीकडे असतो. त्यातही कमीत कमी शिक्षणात कायम स्वरुपी नोकरीचे पर्याय असल्याने बहुतांश तरुण हे रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. तरुणांची रेल्वेत निघणाऱ्या नोकरभरतीकडे करडी नजर असते. अशात आता स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे जॉबबाबत मोठी माहिती दिली आहे. केंद्र सरकार तरुणांना रेल्वे नोकरीची संधी देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं आश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. तसेच रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी अंतर्गत प्रक्रिया सुरु असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत म्हटलं. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे (सुधारणा) विधेयकाबाबत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली. रेल्वे मंत्र्यांच्या उत्तरानंतर विधेयक आवाजी मतदाने मंजूर करण्यात आलं.
“मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यूपीए सरकारच्या काळात 4 लाख 11 हजार जणांना रेल्वेत नोकरी मिळाली होती. तर आता मोदी सरकारमध्ये 5 लाख 2 हजार तरुणांना रेल्वेत नोकरी मिळाली आहे”, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.
“रेल्वेत 58 हजार 642 रिक्त जागांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये रेल्वेत तरुणांना अधिक नोकरीची संधी उपलब्ध करु देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत”, असं रेल्वे मंत्री म्हणाले. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे भरतीचा उल्लेख करत म्हटलं की, कोणत्याही पेपरफुटीच्या तक्रारीशिवाय नियमांनुसार परीक्षा होत आहेत.
मोदींच्या नेतृत्वात रेल्वे अर्थसंकल्पात वाढ झाल्याचं मंत्र्यांनी म्हटलं. याआधी रेल्वेचं बजेट हे 25-20 हजार कोटी इतकं असायचं. मात्र आता मोदी सरकारमध्ये त्यात वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये रेल्वे बजेट 2.52 लाख कोटी इतकं आहे. या 10 वर्षांमध्ये 31 हजार किलोमीटर नवे रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच 15 हजार किमी रेल्वे ट्रॅकवर ‘रेल्वे कवच यंत्रणा’ कार्यन्वित करण्यात आली आहे. समृद्ध देशात जी कामं 20 वर्षात झाली आहेत, त्यासाठी भारतात फक्त 5 वर्ष लागली”, असंही रेल्वे मंत्री म्हणाले.