मणिपूरमध्ये चार आमदारांची घरे जाळली, मुख्यमंत्र्यांच्या गावातील घरावर हल्ला, अमित शाह सर्व सभा रद्द करुन दिल्लीत

| Updated on: Nov 18, 2024 | 9:55 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. परंतु मणिपूरमधील घटनांमुळे त्यांनी यांनी रविवारी होणाऱ्या चारही सभा अचानक रद्द केल्या. गृहमंत्री नागपूरवरुन थेट दिल्लीला परतले. मणिपूरच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मणिपूरमध्ये चार आमदारांची घरे जाळली, मुख्यमंत्र्यांच्या गावातील घरावर हल्ला, अमित शाह सर्व सभा रद्द करुन दिल्लीत
अमित शाह
Follow us on

Manipur Violence: मणिपूरमधील इंफाळमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जमावाने चार आमदारांची घरे जाळली. त्यातील तीन भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे. एक आमदार काँग्रेसचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या जन्मगावी असलेल्या घरावर हल्ला केला. परंतु पोलिसांनी जमावाला पांगवल्यामुळे अनर्थ टळला. जिरीबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह मिळाले. दशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करुन हत्या केली होती. त्यामुळे इंफाळमध्ये हिंसाचार निर्माण झाला. दरम्यान, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द करत दिल्ली गाठली आहे.

भाजप, काँग्रेस आमदारांचे घर पेटवले

मणिपूरमध्ये आंदोलनकर्त्यांनी भाजप आणि काँग्रेस आमदारांचे घर पेटवले. सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंददास कोन्थौजम यांची निंगथौखॉन्ग येथील घरे, ह्यंगलाम बाजारातील भाजप आमदार वाय राधेश्याम, थौबल जिल्ह्यातील भाजप आमदार पूनम ब्रोजेन आणि काँग्रेस आमदार लोकेश्वर यांची घरे जाळण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. त्यावेळी आमदार आणि त्यांच्या परिवारातील लोक घटनास्थळी नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला.

मुख्यमंत्री मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या इंफाळ पूर्व जिल्ह्यातील लुवांगसांगबम येथे असलेल्या वडिलोपार्जित घरावरही हल्ला करण्याचा जमावाने प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना 100-200 मीटर अगोदरच रोखले. यानंतर आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर टायर जाळून वाहनांची वाहतूक रोखली.

हे सुद्धा वाचा

अमित शाह दिल्लीत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. परंतु मणिपूरमधील घटनांमुळे त्यांनी यांनी रविवारी होणाऱ्या चारही सभा अचानक रद्द केल्या. गृहमंत्री नागपूरवरुन थेट दिल्लीला परतले. मणिपूरच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आता केंद्र सरकार त्या ठिकाणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. मणिपूरमधील परिस्थितीमुळे सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. तसेच संचारबंदी लागू केली आहे.