इम्फाळ | 29 सप्टेंबर 2023 : मणिपूरमधील हिंसा काही थांबताना दिसत नाहीये. दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्यामुळे मणिपूरमधील जमाव प्रचंड भडकला. या जमावाने थेट काल संध्याकाळी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडवडिलांच्या घरावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी तर हे घरच पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी या जमावाल पांगवलं. त्यामुले मोठी दुर्घटना टळली. मुख्यमंत्री बिरेन सिंह या घरात राहत नाहीत. ते आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री निवासात राहतात. या आधी हिंसक जमावाने गुरुवारी सकाळी प्रचंड तोडफोड केली. अनेक वाहनांना आगी लावल्या होत्या. त्यामुळे मणिपूरमधील वातावरण अधिकच तापलेलं आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसा पेटली आहे. राज्यातील हिंसाचाराच्या घटना थांबताना दिसत नसल्याने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. 19 थाने क्षेत्राला सोडून संपूर्ण मणिपूरला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे राज्याला अशांत क्षेत्र घोषित केल्यानंतरच राज्यातील हिंसा अधिकच भडकली आहे. त्यामुळेच संतप्त जमावाने थेट मुख्यमंत्र्यांचा घरच पेटवून देण्याचा प्रयत्न केला. इम्फाळमधील हिंगांग परिसरात मुख्यमंत्र्यांचं घर आहे. या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न जमावाने केला. पण या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने पोलिसांनी जमावाला 100 मीटर अंतरावरच रोखलं. या घरात कोणीही राहत नाही. तरीही घराभोवती मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी संतप्त जमावाने इम्फाळच्या पूर्वेला उपायुक्त (डीसी) कार्यालयातच तोडफोड केली. अनेक वाहनांना आगी लावल्या. इम्फाळमधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातील आंदोलन अधिकच हिंसक झालं आहे. जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या एका मुलाची आणि मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन अधिकच हिंसक झालं आहे.
बुधवारी रात्री सगोलबंद, उरीपोक, यैसकुल आणि टेरा आदी भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यामुळे पोलिसांना संतप्त जमावावर अश्रूधुराच्या नळकांडे फोडावे लागले. जमावाला पांगवण्यासाठी लाठीमारही करावा लागला, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिमेच्या जिल्ह्यात आंदोलकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आळा आहे. या हिंसाचारात मंगळवारपासून आतापर्यंत 65 जण जखमी झाले आहेत. थौबल जिल्ह्यातील खोंगजाममध्ये भाजपच्या कार्यालयाला आग लावण्यात आली आहे. त्यानंतर मणिपूरमधील परिस्थिती अजूनच बिघडली आहे. संतप्त जमावाने पोलिसांची वाहनेही पेटवली आहेत. एका पोलिसाला मारहाण करत त्याच्याकडील शस्त्र पळवण्याचा प्रयत्नही जमावाने केला आहे. जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.