संसदेचे अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मोदी 3.0 सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. संसदेत जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. आम्हाला तिसऱ्यांदा जनतेने संधी दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी अधिका वाढली आहे. आम्ही तीनपट अधिक काम करु. विरोधी पक्षाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. देशातील जनतेने दिलेली जबाबदारी सर्वांनी पूर्ण करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 अंकाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, आपल्याकडे 18 पुराण आहेत. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. आता 18 वी लोकसभा आहे. 18 लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल. नवीन जोश, नवा उत्साह आणि नवी गती मिळवण्याची ही संधी आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडली. आमचाही हा तिसरा कार्यकाळ आहे. यामुळे आम्ही तीन पट अधिक मेहनत करु. पहिल्यांदा नवीन संसद भवनात शपथविधी होणार आहे. संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचा दिवस आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला आहे. त्याचा अर्थ त्यांना सरकारची धोरणे आणि हेतू मान्य आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन, देशसेवेसाठी आणि लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकमत निर्माण करण्याचा सदैव प्रयत्न करणार आहे.
27 जून रोजी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. यानंतर 28 जूनपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होईल. त्याचवेळी पंतप्रधान 2 किंवा 3 जुलै रोजी चर्चेला उत्तर देतील. 24 जून ते 3 जुलै या कालावधीत हे अधिवेशन सुरू होणार असून या 10 दिवसांत एकूण 8 बैठका होणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची शपथ होणार आहे. महाराष्ट्रातील 14 खासदार आज शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांना सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला NEET परीक्षेतील गोंधळ, अनेक परीक्षा रद्द या सगळ्या मुद्यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.