पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळास आज सुरुवात होणार आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी समारंभ संध्याकाळी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी मंत्रीपद मिळणाऱ्या सर्व खासदारांना फोन सकाळीच गेले. त्यानंतर ते नवी दिल्ली दाखल झाले. मोदी 3.0 सरकारमध्ये एक चेहरा असा असणार आहे की त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. प्रथमच खासदार आणि पाच हजार कोटींचे मालक असलेल्या चंद्रशेखर पेम्मासानी नेमके कोण आहेत?
आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीएमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्या पक्षाचे 16 खासदार निवडून आले आहे. या पक्षाचे दोन जण मंत्री होणार आहे. त्यात राम मोहन नायडू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांचा समावेश आहे. पेम्मसानी हे आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभेतून निवडून आले आहेत. त्यांनी पोन्नूरमधील विद्यमान वायएसआरसीपी आमदार किलारी वेंकट रोसैया यांचा सुमारे साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता. चंद्रशेखर यांना 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली होती, तर व्यंकट रोसय्या यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली होती. पेम्मासानी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ते सर्वात श्रीमंत उमेदवार होते.
पेम्मासानी यांनी 1999 मध्ये एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर, 2005 मध्ये, त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी पदवी प्राप्त केली. परदेशात राहूनही पेमसानी यांनी गुंटूर मतदार संघात संबंध कायम ठेवले आणि आता येथून निवडून आले त्यानंतर ते मोदी सरकार 3.0 मध्ये मंत्री होत आहेत. पेमसानी यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असे नाही. ते यापूर्वी टीडीपीमध्ये सक्रीय आहे.
राजकारणाव्यतिरिक्त उद्योजक जगात चंद्रशेखर कार्यरत आहे. ते Uworld चे संस्थापक आणि CEO आहेत, एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करते. 2020 मध्ये अर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड जिंकल्यावर त्याला ओळख मिळाली. भारत आणि यूएस मधील 100 हून अधिक कंपन्या आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करून डॉ. पेम्मासानी यांची संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या जंगम मालमत्तेत दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस यांचा समावेश आहे.