देशभरात उद्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, मोदी सरकारची मोठी घोषणा

| Updated on: Mar 14, 2024 | 10:20 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्याआधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

देशभरात उद्यापासून पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, मोदी सरकारची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई | 14 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीआधीच आता घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. देशात पुढच्या एक ते दोन दिवसांत आचारसंहिता लागू शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक प्रचंड कामाला लागले आहेत. असं असताना आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघा काही काळ शिल्लक असताना मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्तर करत असल्याची घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे दर स्वस्त होणार आहेत. हे दर लगेच उद्यापासून लागू देखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात शिंदे सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट करण्याचा किंवा पेट्रोल-डिझेलच्या वॅट कमी करण्याची घोषणा केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. तसेच त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्याआधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे हे स्वस्त दर उद्या सकाळी 6 वाजेपासून देशभरात लागू होणार आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवर (X) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी घट करुन एकदा पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, मोदींचं कोट्यवधी भारतीयांच्या परिवाराचं हित आणि सुविधांवर लक्ष्य आहे”, असं केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले आहेत.

जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या दरात 50 ते 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांना पेट्रोल मिळणंच बंद झालं आहे. गेल्या 50 वर्षात इतकं मोठं तेलसंकट कधीच उद्भवलं नव्हतं तशी परिस्थिती आता आहे. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि चांगल्या नेतृत्वामुळे मोदींच्या या कुटुंबाला कोणतीही अडचण आली नाही”, असंही हरदीप पुरी म्हणाले आहेत.

राजस्थान सरकारची मोठी घोषणा

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या घोषणेआधी राजस्थान सरकारनेदेखील तिथे पेट्रोल-डिझेल स्वस्तची घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने राज्यात पेट्रोल-डिझेलच्या वॅटवर दोन टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे राजस्थानात पेट्रोल 1.40 रुपयांपासून 5.30 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे. तर डिझेल 1.34 ते 4.85 रुपयांपर्यंत स्वस्त झालं आहे.