Nitin Gadkari | एक्सप्रेस वे वर प्रतिकिमीसाठी 250 कोटी खर्चाचा आरोप, नितीन गडकरी यांनी सोडलं मौन

| Updated on: Aug 19, 2023 | 1:02 PM

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांनी एक्सप्रेस वे बांधताना प्रति किलोमीटरसाठी किती खर्च आला, तो थेट हिशोब सांगितला?. कॅगच्या रिपोर्ट्मधून नितीन गडकरी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Nitin Gadkari | एक्सप्रेस वे वर प्रतिकिमीसाठी 250 कोटी खर्चाचा आरोप, नितीन गडकरी यांनी सोडलं मौन
CENTRAL MINISTER NITIN GADKARI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कॅगच्या रिपोर्ट्मधून काही आरोप करण्यात आले आहेत. द्वारका एक्सप्रेस वे प्रोजेक्टच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ऑडिट रिपोर्टमधून आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे सर्व आरोप आज फेटाळून लावले, प्रति किलोमीटरसाठी 250 कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी फेटाळून लावला. कॅगच्या रिपोर्ट्वरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. द्वारका एक्सप्रेस वे च्या बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे.

29.06 किलोमीटरच्या एक्सप्रेस वे वरील प्रत्येक किलोमीटरसाठी अवाच्या सव्वा 250.77 कोटी रुपचे खर्च झाल्याच कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीने प्रति किलोमीटरसाठी 18.2 कोटी रुपये मंजूर केले होते. ही मर्यादा ओलांडण्यात आली, असं कॅगच्या रिपोर्ट्मध्ये म्हटलं आहे.

द्वारका एक्सप्रेस वे ची लांबी किती?

द्वारक एक्सप्रेस वे बांधण्यासाठी जास्त खर्च करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. कॅगच्या रिपोर्ट्मध्ये द्वारका एक्सप्रेस वे 29 किमी असल्याच म्हटलं आहे. पण तसं नाहीय. द्वारका एक्सप्रेस वे 230 किमी लांब असून त्यावर बोगदे सुद्धा आहेत.

प्रति किलोमीटरसाठी खर्च किती?

“द्वारका एक्सप्रेस वे च्या प्रत्येक किलोमीटरसाठी 9.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. कॅगच्या अधिकाऱ्यांना मी हीच गोष्ट सांगितली” असं गडकरी म्हणाले. “त्यांनी ते मान्य सुद्धा केलं होत, पण तरीही त्यांनी त्यांना हवा तसाच रिपोर्ट् बनवला” असं गडकरी म्हणाले.

‘जे परस्परांचा चेहरा पाहत नाहीत ते एकत्र आलेत’

विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, ‘भाजपा विरोधी पक्षांच्या आघाडीची आर्किटेक्ट आहे’ “ज्यांची विचारधारा एक नाही, जे परस्परांचा चेहरा पाहत नाहीत. जे चहा एकत्र पीत नाहीत, आता ते भाजपा विरोधात लढण्यासाठी एकत्र आलेत” असं नितीन गडकरी म्हणाले. भाजपाच्या शक्तीने विरोधकांना एकत्र यायला भाग पाडलं, असं ते म्हणाले.

काश्मीर ते कन्याकुमारीला जोडणारा एक्सप्रेस वे बांधण्याचा सरकारचा विचार असल्याच गडकरी यांनी सांगितलं. पुढच्यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे बांधून पूर्ण होईल असं गडकरी म्हणाले.