75 व्या वर्षी लालूंचा हुंकार… ना गाजावाजा, ना बोलबाला… इंडिया आघाडीच्या पहिल्याच रॅलीला 15 लाखांची गर्दी

| Updated on: Mar 03, 2024 | 8:54 PM

आरक्षण लागू झाल्यानंतर पोलिसांची भरती करायला मी तेजस्वीला सांगितलं होतं. दलित, मागास समाजातील मुलांना आणि मुलींना नोकरी मिळायला हवी ही त्यामागची भूमिका होती. त्यासाठी तेजस्वीने खूप मेहनत केली. रात्र न् दिवस काम केलं. दलित आणि मागासांना त्यांचे हक्क मिळवून दिले, असं लालूप्रसाद यादव म्हणाले.

75 व्या वर्षी लालूंचा हुंकार... ना गाजावाजा, ना बोलबाला... इंडिया आघाडीच्या पहिल्याच रॅलीला 15 लाखांची गर्दी
lalu prasad yadav
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पटना | 3 मार्च 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर राजद नेते लालूप्रसाद यादव यांची साथ सोडली. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांची ताकद कमी झाल्याचं बोललं जात होतं. पण 75 वर्षाच्या लालूप्रसाद यादव यांनी हुंकार भरला आहे. अनेक व्याधींवर मात करून लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. लालूप्रसाद यादव यांनी आज बिहारमध्ये इंडिया आघाडीची रॅली आयोजित केली होती. इंडिया आघाडीची ही पहिलीच रॅली होती. या रॅलीचा कोणताच गाजावाजा करण्यात आला नव्हता. बोलबालाही करण्यात आला नव्हता. त्यामुळे ही रॅली यशस्वी होणार नाही, असं राजकीय वर्तुळातून सांगितलं जात होतं. पण लालूप्रसाद यादवांनी सर्व अंदाज फोल ठरवले आहेत. लालूंच्या आजच्या रॅलीला 15 लाखाहून अधिक लोकांची गर्दी झाली होती. इंडिया आघाडीसाठी हे शुभसंकेत मानले जात आहेत.

पटनाच्या गांधी मैदानावर इंडिया आघाडीच्या जन विश्वास महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आरजेडीने ही रॅली आयोजित केली होती. देशातील इंडिया आघाडीची ही पहिलीच रॅली होती. लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सपा नेते अखिलेश यादव, डी. राजा आणि सीताराम येचुरी आदी नेते या महारॅलीत सामील झाले होते. या रॅलीला 15 लाखाहून अधिक लोक जमल्याची माहिती आहे.

नीतीश कुमारांना धक्का देणार

या रॅलीतून लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी लालूंनी भाजपच्या केंद्रातील कारभाराचेही वाभाडे काढले. यावेळी त्यांनी नाव न घेता नीतीश कुमार यांना चांगलीच समज दिली. आता त्यांनी दुसऱ्यांदा येऊन तर पाहावं. चांगलाच धक्का देऊ. 2017मध्ये जेव्हा नीतीश कुमार महाआघाडीतून एनडीएत केले तेव्हा आम्ही त्यांना शिव्या दिल्या नाही. ते पलटूराम आहेत, असं आम्ही म्हणालो होतो. त्यानंतरही आम्ही त्यांना महाआघाडीत घेतलं. आमची चूक झाली. माझ्याकडून आणि तेजस्वीकडून चूक झाली. पण आता ही चूक होणार नाही, असं लालूप्रसाद यादव म्हणाले.

कोण मोदी?

यावेळी त्यांनी मोदींवरही टीका केली. हे मोदी… कोण आहेत मोदी? मोदी एखादी वस्तू आहे काय? नरेंद्र मोदी अजिबात हिंदू नाहीत. आईचा मृत्यू झाल्यावर दाढी, केस कापण्याची हिंदूंमध्ये परंपरा आहे. मोदींनी ही परंपरा का पाळली नाही? त्याचं त्यांनी उत्तर द्यावं, असं आव्हानच त्यांनी दिलं. बिहारमध्ये जे घडतं, त्याचं अनुकरण देश करतो. बिहारच्या हवेतच दम आहे, असा दावाही त्यांनी केला.

दलित, मागासांना अधिकार दिले

नव्वदच्या दशकात दलित, आदिवासी आणि ओबीसींना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात होतं. त्यावेळी सामंतशाह असायचे. व्होट आणि बूथ दोन्ही आपल्या दरवाजात ते ठेवायचे. मागास समाजाची मते लुटता यावीत म्हणून ते असं करायचे. अशा लोकांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला. लोकांना बळ देण्याचं काम केलं. नव्वदच्या दशकातच आम्ही या छोट्या छोट्या जातींचं गांधी मैदानात संमेलन भरवलं होतं, अशी आठवणही त्यांनी सांगितली.