नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या काल झालेल्या भाषणावरून सुरू झालेला वाद-विवाद शमतो न शमतो तोच त्यांनी आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना डिवचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर एक-दोन नव्हे, तर चक्क तीनदा कौतुकाचा वर्षाव केला. मोदींनी राज्यसभेत केल्या भाषणात विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सत्ता कुणाचीही असो, पण देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नये. देशाच्या सामर्थ्याचा गुणगौरव केला पाहिजे. हे महत्त्वाचे आहे. व्हॅक्सीनेशन इज नॉट बिग डील, असे काही लोक म्हणतात. भारताची एवढी मोठी कामगिरी कामगिरी होत नाही. लसीकरणावर व्यर्थ खर्च होत आहे, असे एकाने सांगितले. देशाने ऐकले तर काय म्हणेल. कोरोना जेव्हापासून मानव जातीवर संकट निर्माण करत आहेत तेव्हापासून सरकारने या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक जीवनात उतार चढाव येत असतात. जय पराजय येत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. गुजरातमध्ये एक गोष्ट आहे. पवारांना माहीत असेल, असे म्हणत त्यांच्या नावाचा उल्लेख केला.
पवारांना माहित असलेली हिरवळ…
मोदी इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी ते उदाहरणही दिले. ते म्हणाले, जेव्हा हिरवळ असते, शेत शिवार हिरवगार झालेले असते आणि कुणी जर ती हिरवळ पाहिली असेल, तर त्याच वेळी अपघात होऊन त्याचे डोळे गेले, तर आयुष्यभर त्याला तो हिरवे चित्रे दिसत असते. तसेच 2013 पर्यंत ज्या दुर्दशेत काढले आणि 2014 मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल, तर त्यांना ते जुने दिवसच दिसतात, असे म्हणत विरोधकांना टोला हाणला.
पवारांकडून शिका जरा…
मोदी पुढे म्हणाले की, सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि तिकडे बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही असे असते का? कोणाकडून शिकता येत नसेल, तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करता आहे. मात्र, त्यातही ते आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. आपल्याला नाराज होण्याची गरज नाही. तुम्ही नाराज होत असाल, तर तुमचे जे मतदारसंघ आहेत तिथले लोकही उदास होतील, असा टोला त्यांनी हाणला.
शरद पवार प्रेरणा देतात…
मोदी म्हणाले की, शरद पवार आपल्या राज्यातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम करतात. 2014 ला सत्ता गेल्याने डोळ्यासमोर काजवे चमकले. खर्गेजी आपणही अधीर रंजन चौधरी यांच्या सारखी चूक करता. देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. काही लोकांना भारताचे यश भारताचे वाटत नाही. लसीकरणावर व्यर्थ खर्च होत असल्याचे सांगितले गेले. कोरोना काळात सरकारने संसाधने वाढवण्याचा प्रयत्न केला. सर्वांना सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला.
पवार बैठकीला आले…
मोदी पुढे म्हणाले की, देशाची जनता लसीकरणासाठी रांगेत उभी राहिली. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांशी 23 बैठका घेतल्या. सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न केला. मात्र, काही लोकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सर्वपक्षीय बैठकीत सरकारकडून सादरीकरण व्हायचे. त्यावेळी बहिष्कार टाकण्यात आला. काही लोक आले नाहीत. शरद पवार आले, टीएमसीचे लोक आले. हे संकट मानव जातीवर आलेले. तुमचे सल्लागार कोण आहेत, आधुनिक चिकित्सा परंपरा आणि भारतीय चिकित्सा परंपरेवर काम केले, आयुष मंत्रालयानं खूप काम केले, असा गौरव त्यांनी केला.