मुंबई : एरव्ही 1 जून सुरू झाला की सरावाने आपण छत्री, रेनकोट, पावसाळी चपला शोधायची तयारी करीत असतो. परंतू यंदा 4 जून संपला तरी केरळात ( Kerala ) मान्सून ( IMD MONSOON ) दाखल झाल्याचा वर्दी काही मिळाली नसल्याने उन्हाच्या काहीलीने कातावलेल्या जीवांची घालमेल सुरु झाली आहे. आता पुन्हा हवामान खात्याने ( Weather Department ) मान्सूनच्या एण्ट्रीबाबत नवीन तारीख जाहीर केली आहे. आता केरळात मान्सूनचा प्रवेश आणखी तीन ते चार दिवसांनी लांबणार आहे.
एक जून येताच मान्सूनची केरळात दणक्यात एण्ट्री होते. आणि सात दिवसात मुंबई आणि कोकणात मान्सून दाखल होतोच असा शिरस्ता आहे. परंतू यंदा 4 जूनला केरळात मान्सून दाखल होईल असे हवामान खात्याने जाहीर केले होते. आता मात्र मान्सूनच्या ताज्या स्थितीबाबत हवामान खात्याने नवीन माहीती दिली आहे. आता केरळात 7 जूनला मान्सूनचा प्रवेश होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमी वाऱ्यात वाढ झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. तसेच पश्चिमी वाऱ्यांचा खाली येण्याचा वेगात वाढ झाली आहे. पश्चिमी वाऱ्यांची पातळी समुद्र सपाटीपासून सरासरी 2.1 किमीपर्यंत पोहचली आहे. दक्षिण – पूर्व अरबी समुद्राच्यावर ढगांची निर्मिती सुरु झाली आहे. या परिस्थिती केरळात मान्सूनचा प्रवेश तीन ते चार दिवसात होईल असा अंदाज आहे.
सर्वसाधारण दक्षिणी-पश्चिमी मान्सूनचा प्रवेश 1 जूनला केरळला होतो. मात्र, यंदा मान्सून यंदा केरळात 4 जूनला येईल असे सांगण्यात आले होते. आता ही तारीख 7 जून सांगितली जात आहे. गेल्यावर्षी केरळात मान्सून लवकर दाखल झाला होता. गेल्यावर्षी 29 मे रोजी केरळात मान्सून धडकला होता. त्याच्याआधी साल 2021 मध्ये 3 जूनला मान्सून केरळात आला होता. तर 2020 मध्ये एक जूनला मान्सून दाखल झाला होता.
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अल-नीनो असूनही यावर्षी भारतात सामान्य पाऊस पडणार आहे. मान्सूनमध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडेल अशी माहीती हवामान विभागाने दिली आहे. यात 5 टक्के कमी जास्त होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर ऑगस्ट – सप्टेंबरात मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अल-नीनोचा प्रभाव पडू शकतो असे म्हटले जात आहे. या दुसऱ्या टप्प्यावेळी पाऊस सामान्य पेक्षा कमी पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.