गोरखपूर : सध्या एक लग्न चर्चेचा विषय ठरला आहे. हे लग्न इतर लग्नासारखे नाही. एका १० मुलांच्या आईचे हे लग्न आहे. या १० मुलांच्या आईने एका बॅचलर मुलाशी लग्न केले आहे. समाजाचा कोणताही विरोध या लग्नाला झाला नाही तर समाजाकडून पाठिंबा त्याला मिळाला. गावकऱ्यांनी हे लग्न लावून दिले. त्यानंतर त्यांना नोकरीसुद्धी दिली आहे. विशेष म्हणजे या लग्नामुळे त्या आईचे सर्व मुले आनंदी आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील हे लग्न आहे.
४४ वर्षीय वधू अन् ४० वर्षीय वर
बदललगंज जवळ असणारे दादरी गाव या लग्नामुळे चर्चेत आले आहे. ४४ वर्षीय वधू १० मुलांची आई असणाऱ्या महिलेने ४० वर्षीय बॅचलर मुलाशी विवाह केलाय. या महिलेच्या पतीचे ६ वर्षांपूर्वी निधन झाले होते. महिलेला तिच्या पतीपासून १० मुले आहेत. १० मुलांपैकी ४ मुली आणि ६ मुले आहेत. सर्वात मोठी मुलगी २३ वर्षांची आहे आणि सर्वात लहान मुलगा ६ वर्षांचा आहे.
त्या दोघांचे प्रेम जुळले
ती ४४ वर्षीय महिला आणि ४० वर्षीय पुरुष एकदा भेटले. मग त्यांचे आकर्षण वाढत गेले. हळूहळू प्रेम वाढू लागले. काही दिवसांनी दोघेही प्रियकर-प्रेयसी गावातून पळून गेले. एका वर्षानंतर दोघेही गावी परतले असता गावकऱ्यांना हा प्रकार कळला. दोघांनाही पंचायतीत बोलावण्यात आले. मग संमतीने प्रेमी युगलाने लग्न करण्याचा निर्णय सांगितला. गावातील मंदिरात गावप्रमुख आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पडला. दोघांमध्ये ५ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.
निराधार मुलांना मिळाला पिता
दुसरीकडे वडिलांची सावली मिळाल्याने निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. लग्नानंतर गावातील लोकांमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा आहे. दोघांच्या या पावलाचे सर्वजण कौतूक करत आहेत. लग्नानंतर गावकऱ्यांनी पती-पत्नी दोघांनाही घरच्यांनी सन्मानाने निरोप दिला. मुलांनीही या लग्नाला होकार दिला.
कॉलेजने दिली नोकरी
गावातील गुरुकुल पीजी कॉलेजचे व्यवस्थापक जयप्रकाश शाही आणि प्रमुख प्रतिनिधी सतीश शाही यांच्या पुढाकाराने हा विवाह पार पडला. शाळेच्या व्यवस्थापकाने दोन्ही विवाहित जोडप्यांना गावकऱ्यांसमोर महाविद्यालयात नोकरी देण्यासाठी नियुक्तीपत्रेही दिली. तसेच त्यांना संस्थेच्या निवासी कॅम्पसमध्ये घरही दिले.