आग ओकणाऱ्या उन्हात गरीबी येथे पोटासाठी भाकरी शोधतेय, श्रीमंती फॅशन बदलल्यानंतर पायातले शूज कचरा पेटीत फेकतेय

| Updated on: May 23, 2023 | 12:44 PM

दुपारच्या तळपणाऱ्या उन्हात मुलांचे पाय भाजू नये म्हणुन आईने त्यांच्या पायात चक्क पॉलिथिनची पिशवी बांधली. देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेने लोकांना हैराण करुन सोडलं आहे.

आग ओकणाऱ्या उन्हात गरीबी येथे पोटासाठी भाकरी शोधतेय, श्रीमंती फॅशन बदलल्यानंतर पायातले शूज कचरा पेटीत फेकतेय
गरीबीचे चटके
Follow us on

भोपाळ : गरीबी वाईट असते, ती कचऱ्यापासून, उष्टं खाण्यापासून, गटारीच्या नाल्याच्या बाजूला झोपताना अधिक वाईट रुप दाखवते. गरीबीत रोज एकच स्वप्न असतं, पोटाची भूक. गरीबी कुणाच्याही शिव्या खायला तयार असते, शाप तर पावसासारखे अंगावर येतात आणि वाहून गेल्यासारखे असतात, कारण आता गरीबीपेक्षा वाईट गरीबासाठी काहीच नसतं. पोटातली कुई कुई काहीही करायला लावते. गरीबीला कुणीच सोडत नाही, निसर्गही नाही.

आग ओकणाऱ्या ऊन, पाऊस, वीज वादळ आणि ती मरणाची थंडीही. गरीबीला हवा असतो, सर्वसामान्यांचा एक मदतीचा हात. गरीबी कचऱ्यातूनही जेवण शोधून घेते, तर श्रीमंती सहज उष्ट्या ताटावरुन उठून जाते.

उष्णतेच्या लाटेने लोक हैराण

ह्दय पिळवटून टाकणारी अशीच एक घटना मध्यप्रदेशच्या श्योपूर शहरात घडली आहे. गरीबीमुळे चप्पल खरीदी करण्यासाठी पैसे नव्हते. दुपारच्या तळपणाऱ्या उन्हात मुलांचे पाय भाजू नये म्हणुन आईने त्यांच्या पायात चक्क पॉलिथिनची पिशवी बांधली. देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेने लोकांना हैराण करुन सोडलं आहे. यातच मध्यप्रदेशच्या श्योपूर शहरातून एक फोटो व्हायरल झाला आहे.

प्रशासनाला आली जाग

यात एक आई तिच्या तीन मुलांसोबत दिसत आहे. मुलांचे पाय भाजू नये म्हणून आईने मुलांच्या पायात पॉलिथिनची पिशवी बांधली आहे, यातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पाहून प्रशासनही जागं झालं आहे.

मदतीच आश्वासन

हे फोटे 21 मे चे आहेत. भर उन्हातून चालणाऱ्या त्या महिलेचं नाव रुक्मिणी आहे. ती तिच्या तीन मुलांसोबत श्योपूर शहराच्या रस्तांवर कामाच्या शोधात चालत होती. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या स्थानिक पत्रकार इन्साफ कुरैशीने त्यांचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले. हे फोटो पाहून प्रशासन खडबडून जागं झालं. त्यांनी त्या महिलेला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

महिलेच्या नवऱ्याने काय सांगितलं?

ती महिला शहरात काम शोधण्यासाठी आली होती. तिचा पती आजारी असल्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती. फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या महिलेचा शोध घेण्यात आला. तेव्हा समजले की, ती तिच्या लहान मुलाला घेऊन जयपूर येथे मजुरी करण्यासाठी गेली आहे. रुक्मिणीच्या पतीने सांगितले की, त्याला टीबी झालाय. त्यामुळे त्याला कामावर जाता येत नाही. त्यांच्याकडे रेशनकार्डही नसल्याने त्यांना अन्न धान्यही मिळत नाही.

श्योपूरचे कलेक्टर काय म्हणाले…

या घटनेची माहिती मिळताच श्योपूरचे कलेक्टर शिवम वर्मा यांनी या महिलेला शोधण्याचे आदेश दिले आहेत. महिला बाल विकास विभागाला आदेश दिले आहेत. त्या परिवाराला सरकारी योजनांचा फायदा मिळवून देणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.