Rajdhani Express Cockroach Found : दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यांमध्ये भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तर्फे जेवण आणि पाणी देण्याची सोय असते. पण आता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने ट्विटरवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
रविवारी (७ जुलै) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटलेल्या मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये मिळालेल्या जेवणाबद्दल प्रवाशाने तक्रार दाखल केली आहे. त्या प्रवाशाने ट्वीटरवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याने ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल त्याने संताप व्यक्त केला आहे.
“काल CSMT मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करत असताना जेवण तिकिटासोबत बुक केले होते. या जेवणात एक झुरळ तरंगत होता, सोबत फोटो जोडत आहे. तक्रार केल्यानंतर मॅनेजर आले आणि म्हणाले तुम्हाला पैसे परत देतो, तिकिटाचे पैसे ही परत देतो. पैसे परत करणे हा पर्याय तरी का आहे? रेल्वे मंत्रालयाने कंत्राटदाराला बाद केले पाहिजे, अशी मागणी त्या प्रवाशाने केली आहे.
जेवण खाल्लं असतं तर विषबाधा झाली असती आणि कित्येक लोकांना कदाचित झाली ही असावी. यापुढे irctc चे ऑर्डर कधीच करणार नाही. नुसत्या मोठ्या मोठ्या थापा असतात की आम्ही रेल सुविधा सुधारली”, असेही त्या प्रवाशाने म्हटले आहे.
काल CSMT #मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करत असताना जेवण तिकिटासोबत बुक केले होते.
या जेवणात एक झुरळ तरंगत होता, सोबत फोटो जोडत आहे.
तक्रार केल्यानंतर मॅनेजर आले आणि म्हणाले तुम्हाला पैसे परत देतो, तिकिटाचे पैसे ही परत देतो.
(१/२)#महाराष्ट्र pic.twitter.com/l13nm54jLL
— Sankalp Shriwastav (@SankalppSpeaks) July 7, 2024
त्या प्रवाशाने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल संताप व्यक्त केल्यानतंर रेल्वे प्रशासनाने त्याची माफी मागितली आहे. IRCTC ने त्याच्या ट्वीटवर कमेंट केली आहे. सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल अत्यंत क्षमस्व. या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सेवा पुरवठा दारावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच या स्वयंपाकगृहाची सुविधा तात्पुरती बंद केली गेली आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
महोदय,
आपको हुई असुविधा के लिए अत्यंत खेद है । घटना को गम्भीरता से लिया गया है तथा हमारे आनबोर्ड सुपरवाइजर द्वारा आपको अटैॅड कर आश्वस्त किया गया है । सेवा प्रदाता पर उचित कार्यवाई की गई है एवम रसोई सुविधा को भी नियंत्रण उपचार के लिए अस्थाई रुप से बंद किया गया है ।— IRCTC (@IRCTCofficial) July 7, 2024
दरम्यान यापूर्वीही अनेकदा रेल्वेतील जेवणात झुरळ, विष्ठा आढळल्याचा प्रकार समोर आला होता. काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मागवलेल्या जेवणात प्रवाशाला मेलेलं झुरळ आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता एका प्रवाशाच्या जेवणात झुरळ आढळलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छतेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.