लखनऊ : किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई, मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई… अशा अनेक शेरोशायरीमुळे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे राणा यांना लखनऊच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना अपोलो रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मुनव्वर राणा यांची कन्या आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या सुमैया राणा यांनी रात्री 3.30 वाजता एक व्हिडीओ जारी करून राणा यांच्या प्रकृतीची माहिती दिली. वडील मुनव्वर राणा यांनी तब्येत गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यामुळे त्यांना लखनऊच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं सुमैया यांनी सांगितलं.
दोन ते तीन दिवसांपासून वडिलांची तब्येत अधिकच खालावली आहे. त्यांना डायलिसिसवेळी पोटदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना अॅडमिट केलं आहे. तसेच त्यांचा सिटिस्कॅन आला असून त्यांच्या गॉल ब्लॅडरमध्ये काही अडचणी दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांची सर्जरीही करण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही, असं सुमैया यांनी सांगितलं.
सर्जरीनंतरही वडिलांची प्रकृती खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर झालं असून ते दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडिलांसाठी डॉक्टरांनी पुढचे 72 तास क्रिटिकल असल्याचं सांगितलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुनव्वर राणा हे गेल्या वर्षभरापासून आजारी आहेत. गेल्या वर्षीही त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआयमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. राणा यांना किडनीचा आजार असल्याने त्यांचे डायलिसीस केले जायचे. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.