नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. भारतातील मुस्लिमांना घाबरण्याचं कारण नाही. मात्र, मुस्लिमांनी आपल्या श्रेष्ठत्वाचा बडेजाव करू नये. त्यांनी अहंकार सोडावा, असं सल्ला मोहन भागवत यांनी दिला आहे. संघाचं मुखपृष्ठ असलेल्या पांचजन्यला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम आणि इस्लामबाबत आपली मते मांडली आहेत. त्यामुळे भागवत यांच्या या विधानावर प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे साध सरळ सत्य आहे की, हिंदुस्थानला हिंदुस्थानच ठेवलं पाहिजे. आज भारतात मुस्लिमांना घाबरण्याचं बिल्कूल कारण नाही. इस्लामला कोणताही धोका नाहीये. मात्र, त्यांनी आपल्या श्रेष्ठत्वाची टिमकी वाजवू नये, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.
आमचा वंश महान आहे. आम्ही या देशावर राज्य केलं होतं. पुन्हा या देशावर राज्य करू. केवळ आमचा मार्ग योग्य आहे. इतरांचा चुकीचा आहे. आम्ही वेगळे आहोत, त्यामुळे आम्ही असेच राहू. आम्ही एकत्र राहू शकत नाही. मुस्लिमांना हा नॅरेटिव्ह सोडावा लागेल. खरे तर इथे राहणाऱ्या सर्वांनी… मग तो हिंदू असो की कम्युनिस्ट… प्रत्येकाने हा तर्क सोडला पाहिजे, असंही ते म्हणाले.
जगभरातील हिंदूमध्ये एकप्रकारची आक्रमकता दिसत आहे. कारण एक हजार वर्ष युद्ध करणाऱ्या समाजामध्ये जागृती आली आहे. हिंदू समाज 1000 वर्षापासून युद्धाच्या तयारीत आहे. ही लढाई विदेशी आक्रमण, विदेशी प्रभाव आणि विदेशी षडयंत्राच्या विरोधात सुरू आहे. संघाने त्याला पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या लोकांचाही त्याला सपोर्ट मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इतिहासाची गणना जेव्हापासून सुरू झाली. तेव्हापासून भारत अखंड राहिला आहे. परंतु जेव्हाही हिंदू ही भावना आपण विसरलो तेव्हा भारत विभागला गेला. हिंदू असणं ही आमची ओळख आहे. आमचं राष्ट्रीयत्व आहे. आमच्या सभ्यतेची विशेषता आहे. सर्वांना आपलं मानणारा हा गुण आहे.
सर्वांना आपल्यासोबत घेऊन जातो. केवळ आमचं सत्य सत्य आणि तुमचं सत्य खोटं असं आम्ही कधीच म्हणत नाही. तुम्ही तुमच्या जागी ठिक आहात. आम्ही आमच्या जागी. यासाठी का भांडावं? चला सर्वांनी मिळून पुढे जाऊ. हेच हिंदुत्व आहे, असंही ते म्हणाले.