देशातील आदर्श व्यक्तीमत्व आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा देशातील युवकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी 70 तास काम करण्याच्या वक्तव्यावर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले. “मला माफ करा, मी माझा दृष्टिकोन बदललेला नाही. मी हा दृष्टिकोन माझा सोबतच घेऊन जाईन,” असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. सीएनबीसी ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.
1986 मध्ये भारतात सहा दिवसांच्या आठवड्याऐवजी पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला होता. त्यावर नारायण मूर्ती यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले, कठोर परिश्रम हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. भारताच्या विकासासाठी आरामाची नाही तर त्यागाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यात 100 तास काम करतात. जेव्हा पंतप्रधान इतके काम करतात तेव्हा आमच्याजवळच्या लोकांनी त्या पद्धतीने काम करायला हवे. नारायण मूर्ती यांनी मागील वर्षी युवकांना आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. काही जणांनी त्यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता. मात्र अनेकांनी विरोध केला होता. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. 70 तास काम केल्यानंतर लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, असे काही जणांचे
म्हणणे होते.
नारायण मूर्ती यांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनी आणि जपानचे उदाहरण दिले. जर्मनी आणि जपानमधील लोकांनी त्या देशांच्या पुनर्बांधणीसाठी हेच केले आहे. यामुळे भारतीय तरुणांनी असे करणे स्वतःचे आणि देशाचे ऋण फेडण्यासारखे आहे.
नारायण मूर्ती यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसची स्थापना 1981 मध्ये केली होती. तेव्हापासून 2002 पर्यंत तेच कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर 2002 ते 2006 पर्यंत ते चेअरमन होते. ऑगस्ट 2011 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा 2013 मध्ये एग्जिक्यूटिव्ह चेअरमन म्हणून त्यांची कंपनीत एन्ट्री झाली होती.