Narendra Modi and Manmohan Singh: राजकारण आणि सत्ताकारणात आगळीवेगळी परंपरा निर्माण करणारे विरळच आहे. सत्तेत आल्यानंतर सरकारी पैशांची उधळपट्टी केली जाते. घरातील सजावटीपासून फर्निचरपर्यंतचा खर्च सरकारी तिजोरीतून होत असतो. विविध सण-उत्सवसुद्धा सरकारी तिजोरीतून साजरे केले जातात. परंतु देशासाठी दोन पंतप्रधानांची गौरवास्पद बाब निर्माण करुन दिली आहे. या दोन्ही पंतप्रधानांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पैशांनी दिवाळी साजरी केली नाही. त्यांनी आपल्या खर्चाने हा देशातील सर्वात मोठा सण साजरा केला. त्यामध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी यासंदर्भात माहिती विचारली होती. त्यात त्यांना देण्यात आलेल्या उत्तरात म्हटले आहे की, दोन पंतप्रधानांनी दिवाळीसाठी सरकारी पैसा वापरला नाही. दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही दिवाळी स्वतःच्या पैशातून साजरी केली. आरटीआयमधून विचारलेल्या प्रश्नात पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.
दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला आदर्श देशातील इतर राजकारणी घेणार का? असा प्रश्न प्रफुल्ल सारडा यांनी उपस्थित केला आहे. डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांनी आपापल्या 10 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या काळात जी दिवाळी साजरी केली ती सरकारी पैशातून साजरी केली नाही. कोणताही खर्च सरकारी तिजोरीतून केला नाही. या पद्धतीने आमदार, खासदार, मंत्री यांनी आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी जवानांसोबत साजरी करत असतात. त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून ही परंपरा सुरु केली आहे. दरवर्षी सीमेवर जाऊन ते जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्र घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सियाचिन ग्लेशियर येथे जाऊन दिवाळी साजरी केली.