नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज लोकसभेत भाषण केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या अभिभाषावर त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी विरोधकांची क्षमता, योग्यता, समज काढली. तसेच त्यांनी विरोधकांच्या ध्येयावर संशय व्यक्त केला. त्यांच्या या भाषणावेळी विरोधकांनी गदारोळ करण्याचादेखील प्रयत्न केला. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी बोलू लागले. विशेष म्हणजे मोदी यांनी या भाषणावेळी राहुल गांधी यांचं नाव न घेता खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
“इथे सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रत्येकाने आपापले आकडे आणि तर्क दिले.आणि आपल्यातील वृत्ती, प्रवृत्तीनुसार आपलं म्हणणं मांडलं”, असं मोदी म्हणाले.
“आता या गोष्टींना समजण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की, कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आहे, तसेच कुणाची किती समज आहे आणि कुणाचा काय इरादा आहे. हे सगळं आता सपष्ट होतंच आहे”, असा टोला त्यांनी लगावला.
“मी चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करतो. पण मी पाहत होतो काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टीम, समर्थक उड्या मारत होते”, असा चिमटा मोदींनी काढला.
“काही लोक खूष होऊन बोलू लागले की, ये होईना बात! त्यांना झोपही चांगली लागली होती. कदाचित आज ते झोपेतून उठलेही नसतील. आणि अशा लोकांना खूप चांगल्याप्रकारे बोलण्यात आलं आहे की, ये कह कहकर हम, दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”, अशा शेरो शायरीत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
“राष्ट्रपतीचं भाषण सुरु होतं तेव्हा एका बडा नेत्याने महामहीम राष्ट्रपतींचा अपमान केला. आमच्या समाजाप्रती त्यांचे विचार काय होते, त्यांच्या मनात द्वेषाची जी भावना होती ते समोर आली”, असा दावा मोदींनी केला.
“ठिक आहे नंतर चिठ्ठी लिहून वाचण्याचा प्रयत्न केला गेला”, असंही ते यावेळी म्हणाले.
“राष्ट्रपतींच्या भाषणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली. मी सगळ्यांचं बोलणं ऐकलं. राष्ट्रपतींच्या भाषणावर कुणालाही आक्षेप नाही. त्यांना राष्ट्रपतींचे सर्व मुद्दे पटले आहेत”, असं मोदी म्हणाले.
“राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणातून आम्हाला सगळ्यांना आणि कोट्यवधी नागरिकांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांची उपस्थिती ऐतिहासिक आहे. राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाचा गौरव वाढवला आहे”, असं मोदी म्हणाले.
“देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरी आदिवासी समाजाचा जो गौरव झालाय, त्यांचा जो आत्मविश्वास वाढला आहे, त्यासाठी हे सभागृह आणि देश आभारी आहे. राष्ट्रपतींच्या भाषणात संकल्पापासून ते सिद्धीपर्यंतच्या यात्रेचा प्रवास खूप चांगल्या प्रकारे मांडण्यात आला आहे. त्यातून देशाला प्रोत्साहन मिळालं आहे”, असंदेखील मोदी म्हणाले.