नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर कधी आणि कुठे होणार त्यांचा शपथविधी? काय असेल खास

| Updated on: May 30, 2024 | 8:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रसंग खास बनवले आहेत. मग ते शपथविधी सोहळा असेल तरी देखील. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर त्यांच्या शपथविधीसाठी पक्षाने खास तयारी केली आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर कधी आणि कुठे होणार त्यांचा शपथविधी? काय असेल खास
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि सातवा टप्प्याचे मतदान १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. मोदींनी यंदा एनडीएला अब की बार ४०० पार असा नारा दिला होता. जर पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर त्यांच्या शपथविधी आणखी खास करण्यासाठी पक्षाने योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याआधीचे २ शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडले आहेत. पण जर एनडीए सत्तेत आली तर मात्र यंदा दुसऱ्या ठिकाणी शपथविधी कार्यक्रम ठेवण्याचा भाजपचा विचार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात जर एनडीएचं सरकार सत्तेत आलं तर शपथविधी कोठे होणार, असा प्रश्न आतापासून अनेकांना पडला आहे. हिंदुस्तान टाईममध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जर मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर ९ जून रोजी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. सूत्रांचा हवाल्यानुसार संभाव्य शपथविधी सोहळ्यासाठी एक तात्पुरती योजना आधीच तयार केली गेली असल्याची माहिती आहे.

शपथविधी कोठे होणार?

2014 मध्ये एनडीए सरकारचा 26 मे (सोमवार) रोजी शपथविधी पार पडला होता.  त्या वर्षी 16 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. 2019 मध्ये एनडीए सरकारचा 30 मे (गुरुवार) रोजी शपथविधी झाला होता. त्या वर्षी 23 मे रोजी निकाल जाहीर झाला होता. हे दोन्ही शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाले होते.

पण आता वृत्त असे आहे की, यावेळी भाजपकडून काही वेगळा विचार सुरु आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा न घेण्याच्या ते विचारात आहे. यावेळी पक्ष बाहेर जागा शोधत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावता येईल. यासाठी कर्तव्यपथचा देखील विचार केला जात असल्याची चर्चा आहे.

कोणती असेल पर्यायी जागा

‘कर्तव्य पथ’ किंवा मग पर्यायी व्यवस्था देखील केली जाऊ शकते. निवडणुकीच्या निकालानंतरच जागा ठरवली जाईल असं देखील दुसऱ्या सूत्रांची माहिती आहे.

या सगळ्या परिस्थितीत हवामानाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. पाऊस असेल तर बाहेर शपथविधी होणे कठीण आहे. दुसरीकडे दिल्लीत तापमान प्रचंड वाढले आहे. यंदा तापमानाने रेकॉर्ड मोडले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य तिसऱ्या शपथविधी सोहळ्याची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) कार्यकारिणी बैठकीत सांगितले की, पक्ष 10 जून रोजी आपला स्थापना दिवस साजरा करू शकणार नाही. शपथविधी सोहळ्यात ते व्यस्त असतील.