देशात नुकत्याच दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये दोन्ही ठिकाणी काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. आता काँग्रेससोबत विधानसभा निवडणूक लढवणार पक्ष काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती करुन निवडणूक लढवली होती. परंतु आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुला यांनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. चार अपक्षांच्या पाठिंबा मिळाल्यानंतर ते काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याच्या तयारीत आहे.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला 42 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला सहा जागांवर विजय मिळवला. जम्मू-काश्मीरमध्ये बहुमतासाठी 45 ही मॅजिक फिगर हवी. नॅशनल कॉन्फरन्सला चार अपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांची सदस्य संख्या 46 झाली आहे. त्यांना आता काँग्रेसची गरज राहिली नाही. यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुला यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.
उमर अब्दुला जम्मू-काश्मीरचे मुक्यमंत्री होणार आहे. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारसोबत समन्वय ठेवला जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे प्रश्न केंद्र सरकारशी लढून नाही तर समन्वयातून सुटणार आहे. जम्मू-काश्मीर सरकार उपराज्यपाल आणि केंद्र सरकार दोन्हींसोबत चांगले संबंध निर्माण करेल. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी दिल्ली सरकारसोबत मिळून काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानीय व्यक्ती आहेत. त्यांनी निवडणूक प्रचारात जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा हे आश्वासन दिले होते. कलम 370 संदर्भात आमच्यात मतभेद नसतील. आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. परंतु तो योग्य वेळी मांडला जाईल.
उमर अब्दुला म्हणाले, काँग्रेससोबत युती नसतानाही नॅशनल कॉन्फरन्सची कामगिरी चांगली झाली असती. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, “काँग्रेससोबतच्या युतीमुळे आमच्या जागा वाढल्या नाहीत. एक जागा वगळता इतर सर्व जागा काँग्रेसशिवाय आम्ही जिंकू शकलो असतो.”