टेलिफोन आणि मोबाईल यांची क्रांती घडण्याआधी भारतात पत्र व्यवहार हे एकमेव माध्यम होतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या नातेवाईक, आप्तेष्टांना निरोप पाठवण्याचं काम पत्राद्वारे केलं जायचं. पत्र हा त्याकाळच्या संभाषणाचा महत्त्वाचा दुवा होता. त्यामुळे पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनबद्दल एक वेगळी आत्मियता असायची. त्या काळात तितकी साक्षरता गाव-खेड्यात नसायची. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या हट्टापाई पोस्टमन हे स्वत: पत्र देखील वाचून द्यायचे. पत्रामुळे अनेकांना दिलासा मिळायचा. आपल्या जवळची व्यक्ती मैलोंमैल लांब असली तरी सुखरुप आहे याची खात्री पत्रामुळे व्हायची. भारतात टपाल सेवेचा एक मोठा इतिहास राहिला आहे. विशेष म्हणजे टपाल विभाग किंवा पोस्ट विभाग हे सर्वसामान्यांच्या अतिशय जवळ राहिले आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरला दरवर्षी राष्ट्रीय टपाल दिवस किंवा राष्ट्रीय डाक दिवस साजरा केला जातो.
भारतात दरवर्षी 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय टपाल दिवस साजरा केला जातो. याच दिवशी भारतीय टपाल सेवेची स्थापना झाली होती. त्यामुळे या दिवसाला भारतीय टपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय टपाल सेवेत कार्यरत असणाऱ्या पोस्टमन, तथा पोस्टाच्या विविध सेवा, संचार आणि वाणिज्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सन्मान केला जातो. त्यांच्या सन्मानासाठीच हा दिवस साजरा केला जातो. भारतीय टपाल किंवा पोस्ट विभागाच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. भारतीय पोस्ट विभाग केवळ पत्र किंवा पार्सलची डिलिव्हरी करत नाही तर विविध वित्तीय सेवा, सरकारी सेवा आणि विविध प्रकारच्या सुविधा प्रदान करते.
भारतीय टपाल सेवेची स्थापना 10 ऑक्टोबर 1854 ला झाली होती. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात टपाल सेवेला सुरुवात केली होती. भारताच्या या पोस्ट विभागाने देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पोस्ट विभाग केवळ पत्र आणि पार्सलची डिलिवरी करत नाही तर वित्तीय सेवा, विमा आणि इतर सुविधा देखील प्रदान करतं.
खरंतर नोव्हेंबर महिन्यात 9 ते 15 ऑक्टोबर या काळात राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जातो. 9 ऑक्टोबरला जागतिक डाक दिवस साजरा केला जातो, 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय डाक दिवस, 11 ऑक्टोबरला पीएलआय दिवस, 12 ऑक्टोबरला डाक तिकीट संग्रह दिवस, 13 ऑक्टोबरला व्यापर दिवस, 14 ऑक्टोबरला विमा दिवस आणि 15 ऑक्टोबरला मेल दिवस साजरा केला जातो.