चंदीगड: पंजाबमधील काँग्रेसची सत्ता गेली तरी पंजाब काँग्रेसमधील (congress) धुसफूस थांबलेली नाही. त्यातच आज काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा पलटी मारणार असण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. स्वत: सिद्धू यांनी ट्विट करून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करणार असल्याचंही सिद्धू यांनी स्पष्ट केलं आहे. पण सिद्धू यांनी भेटीचं कारण वेगळं दिलं असलं तरी सिद्धूंचा स्वभाव, काँग्रेसमधील धुसफूस आणि त्यातच होऊ घातलेली मुख्यमंत्र्यांसोबतची भेट यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातचं सिद्धूंवर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवारही आहेच. त्यामुळे सिद्धू पक्षांतर तर करणार नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. तर, सिद्धू यांच्या या भेटीकडे काँग्रेसही बारकाईने लक्ष ठेवून आहे.
सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेण्यापूर्वी दोन शेर ट्विट केले आहेत. ‘हमारी अफवाहों का धुआं वहीं से उठता है, जहां हमारे नाम से आग लग जाती है।’ हा शेर ट्विट केल्यानंतर त्यांनी आणखी एक शेअर ट्विट केला आहे. ‘करते तो दोनों ही थे। हम कोशिश, वो साजिश..।’ सिद्धू यांनी हा शेर ट्विट केल्याने चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे. मात्र, सिद्धूंचा निशाणा कुणावर आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र त्यांच्या निशाण्यावर काँग्रेस नेतेच असल्याची कुजबुज आहे.
Will meet CM @BhagwantMann tomorrow at 5:15 PM in Chandigarh to discuss matters regarding the revival of Punjab’s economy . . . Punjab’s Resurrection is only possible with an honest collective effort . . .
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 8, 2022
नवज्योतसिंग सिद्धू यांचं काँग्रेसमधील कोणत्याच नेत्याशी सूत जुळू शकलं नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग, चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी त्यांचं जमलं नाही. अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनाही त्यांनी आव्हान दिलं होतं. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरी यांनी हायकमांडला तक्रार दिली आहे. सिद्धूंवरील कारवाईचं प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आलं आहे. मात्र, पक्षाची बैठक पुढे ढकलल्या गेल्याने सिद्धूंना थोडा दिलासा मिळाला आहे. आता सिद्धू भगवंत मान यांची भेट घेत आहेत. त्यामुळे सिद्धू यांच्या खेळीचा हा भाग असल्याचंही सांगितलं जात आहे.