नवी दिल्ली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मतदारांनी जर कुणाकडून पैसे घेतले तर त्यांच्या मागे ईडी (ed) लागेल असं विधान केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी दिल्लीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात होतो. मी वर्तमानपत्रं पाहिलं. तर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाचं विधान होतं. तिथे पोटनिवडणूक चालू आहे. भाजपला मत नाही दिलं तर ईडी तुमच्या घरी येऊ शकते, असं त्याचं विधान होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं, असं शरद पवार म्हणाले. याबाबत पंतप्रधानांकडे तक्रार केलीय का? असा सवाल पवार यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. शरद पवार यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला.
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीचा तपशीलही सांगितला. ही भेट लक्षद्विपमधील काही मुद्द्यांबाबत होती. यावेळी मोदींकडे राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांबाबत आणि शिवसेना नेते संजय राऊतांवर झालेल्या कारवाईबाबत पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच नवाब मलिकांच्या कारवाईवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राऊत हे राज्यसभेतील खासदार आहेत. ते वरिष्ठ पत्रकारही आहेत. तरीही त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यता आली आहे,. त्यांची 8 ते 10 एकर जमीन, फ्लॅट ताब्यात घेण्यात आला आहे. हा अन्याय आहे, असं पंतप्रधानांना सांगितल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांच्यावरील आरोप काय? ते केवळ सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादी सेना भाजपविरोधात एकत्र उभी आहे. इतरांच्या सांगण्यावरुन भाजपसोबत राष्ट्रवादी मुळीच जाणार नाही. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करणार. मविआ सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आघाडी सरकारमध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर पवारांनी थेट भाष्य करणं टाळलं. मी यावर बोलू शकत नाही. कारण हा तीन पक्षाचा निर्णय आहे. हे तीन पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील. त्याविषयी मला माहीत नाही. मला फक्त एकाच पक्षाबाबत माहीत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादीत व्हॅकेन्सी आहे. पण सध्या तरी पक्षात कोणताही बदल करण्यात येणार नाही. रिक्त जागांबाबत पक्ष नेत्यांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलू, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Pawar Modi Meet: ठाकरे मंत्रीमंडळाचं खांदेपालट होणार का? पवारांनी राष्ट्रवादीसह सरकारचही सांगितलं