नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद (NCP Sharad Pawar PC From Delhi) घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं पत्र तथ्यहीन असल्याचं सांगितलं. गृहमंत्री फेब्रुवारीच्या 15 ते 27 या तारखेपर्यंत हे कोरोनामुळे विलगीकरणात होते, असं शरद पवारांनी सांगितलं. मात्र, यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगितलं की अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत होते. तसा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊण्टला आहे. यावर शरद पवार संतापले आणि म्हणाले “इनफ इज इनफ” (NCP Sharad Pawar PC From Delhi Sharad Pawar Says Enough Is Enough To Reporters).
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले.
सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरुन 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वॉरंन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता, असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारीचा पत्रकार परिषदेतील व्हिडीओ शेअर एक ट्वीट केलं.
देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत विचारलं, “15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”
15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.
पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.
हे नेमके कोण? https://t.co/r09U8MZW2m— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
तसेच, भाजपच्या अमित मालविया यांनी देखील अनिल देशमुखांचा त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ ट्वीट केला.
Sharad Pawar claims Anil Deshmukh was in hospital from 5-15 Feb and in quarantine from 16-27 Feb.
But Anil Deshmukh was holding a press conference on 15 Feb…
How lies fall flat! https://t.co/ceZGxFaIYz
— Amit Malviya (@amitmalviya) March 22, 2021
त्यानंतर एका पत्रकाराने शरद पवारांना याबाबत विचारलं, की नुकतंच अमित मालविया यांनी एक ट्वीट केलंय की अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत होते, याचा व्हिडीओ आहे. तो व्हिडीओ अनिल देशमुख यांनी स्वत: शेअर केला होता. मग तुम्ही म्हणताय की ते घरी होते. यावेळी शरद पवारांकडे काहीही उत्तर नव्हते, कारण त्यांना याबाबत काहीच माहिती नाही.
माझ्याकडे ते रुग्णालयात असल्याची सर्व कागदपत्र आहेत, असं शरद पवार म्हणाले. तसेच, तो व्हिडीओ त्याच दिवशीचा आहे हे कशावरुन असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. त्यानंतर सांगण्यात आलं की ती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची पत्रकार परिषद होती. पण त्यामध्ये सर्व चॅनलचे माईक असल्याने पत्रकार पुन्हा प्रश्न विचारु लागले. प्रश्नांनी शरद पवारांवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी मात्र, शरद पवार म्हणाले – “मी आधीच तुमचं ऐकलं, इनफ इज इनफ”.
सिंग यांनी जे आरोप केले आहेत. त्या कालावधीत देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही, अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे. त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिलंय. मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती, असं सांगतानाच परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते? ते आरोपासाठी महिनाभर का थांबले? असा सवाल त्यांनी केला. परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत. मला त्यात पडायचं नाही, असंही ते म्हणाले (NCP Sharad Pawar PC From Delhi Sharad Pawar Says Enough Is Enough To Reporters).
अनिल देशमुख यांची चौकशी करणार का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर पवारांनी थेट यूटर्न घेतला. आता आलेल्या कागदपत्रावरून देशमुख हे मुंबईत नव्हतेच. ते नागपूरला होते आणि कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे सिंग यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे चौकशीचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले. तसेच तरीही चौकशी करावी की करू नये हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबाबत मी कालही बोललो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंग यांनी जे जे मेन्शन केलं आहे, वाझेप्रकरणात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुख्य केस काय आहे तर संबधीत गोष्टी अंबनीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. गाडी कुणाची होती, कुणाच्या ताब्यात होती, कुणी वापरली आणि गाडीमालक हिरनेची हत्या कशी झाली? हे महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काल एटीएसने दोघांना अटक केली आहे. हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे. यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली, त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली. आता तपास सत्य बाहेर येईल. उद्या-परवा कधी येईल माहिती नाही. मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे. हिरेन हे त्या जीपचे मालक होते, त्यांची हत्या झाली, एटीएसने त्यामध्ये दोघांना अटक केली आहे, हिरेन केसमध्ये एटीएस करेक्ट दिशेला आहे. ही केसमधून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत होता, असंही ते म्हणाले.
NCP Sharad Pawar PC From Delhi Sharad Pawar Says Enough Is Enough To Reporters
संबंधित बातम्या :
वाझे-देशमुख यांची भेट झाल्याचा दावा चुकीचा; शरद पवारांनी केली परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड
मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार