नांदेड | 26 सप्टेंबर 2023 : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने देशातील कुविख्यात गँगस्टरची यादी जाहीर केली आहे. एनआयएनने एकून 43 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना एनआयएने नांदेडकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याला कारणही तसं आहे. यातील अनेक गँगस्टर नांदेडमध्ये लपून बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसह सर्वांचं लक्ष नांदेडवर लागलं आहे. नांदेडमधील हॉटेल्स, लॉज आणि विश्रामगृहांवर पोलीस करडी नजर ठेवून असल्याचं सांगितलं जात आहे.
भारत आणि कॅनडा देशातील तणावाचा फायदा घेऊन या यादीतील काही गँगस्टर नांदेडला आश्रयाला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड पोलिसांनी दक्षतेचा इशारा दिला आहे. कोणतीही संशयित व्यक्ती दिसली किंवा कोणत्याही व्यक्तीच्या हालचाली संशयित वाटल्या तर तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. एनआयएने देशातील 43 गँगस्टरची फोटोसह यादी प्रसिद्ध केली आहे. त्यातील काहीजण नांदेडला येऊन राहिले असावेत किंवा काहीजण राहायला येण्याची शक्यता असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
एखादा व्यक्ती संशयित वाटला किंवा कुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तर तात्काळ 112 वर संपर्क साधा. किंवा पोलिस नियंत्रण कक्ष नांदेड येथील दूरध्वनी क्रमांक 02462-234720 वर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हे गँगस्टर नांदेडसह भारतातील कोणत्याही शहरात राहू शकतात. नांदेड शहर धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. या शहरात देशविदेशातील लोक येत असतात. त्यामुळे हे गँगस्टर नांदेडमध्ये आश्रयाला येऊ शकतात. त्यामुळे लॉज आणि हॉटेल चालकांनी प्रत्येक व्यक्तीला रुम देताना त्याची चौकशी करावी. त्याच्याकडून पुरावे घ्यावेत, तरच त्यांना प्रवेश द्यावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
एनआयएने जारी केलेल्या यादीत देशातील अत्यंत कुख्यात गँगस्टरचा समावेश आहे. लॉरेन्स बिश्नोई, जयदीप सिंग, जोगिंदर सिंह गोल्डी बरार अन्सारी, अनमोल बिश्नोई, अर्शदीप सिंग गिल, लखबीर सिंग, सन्नी डागर, आसिफ खान, छोटू राम ऊर्फ भट, नाविद डबास ऊर्फ नविन बाली आदींचा यात समावेश आहे.