Gadkari on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोग कधीही निवडणुकीची घोषणा करु शकते. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. टीका, आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना त्यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी गडकरींना महाविकासआघाडीमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. ते म्हणाले की, गडकरींचा अपमान होत असेल तर त्यांनी भाजप सोडून महाविकास आघाडीत यावे. आपण गडकरींचा विजय निश्चित करू आणि आपले सरकार सत्तेवर आल्यावर गडकरींना मंत्री करू आणि ते अधिकार असलेले पद असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह, ज्यांना भाजपने कथित भ्रष्टाचारावरून लक्ष्य केले होते, अशा लोकांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती, परंतु गडकरींना अजून उमेदवारी जाहीर केली नाही.
नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची ऑफर अपरिपक्व आणि हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपमध्ये निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची पद्धत आहे. उद्धव यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गडकरी म्हणाले की, शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांची काळजी करण्याची गरज नाही.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून तर अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.
भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या यादीत ही नावे जाहीर केले जातील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.