नवी दिल्ली: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत थेट राहुल यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. राहुल यांची भेट घेऊन ते पटोले यांची तक्रार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राऊत यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत. राऊत आणि थोरात एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. (nitin raut and balasaheb thorat reached at delhi to meet rahul gandhi)
नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात आज अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. ते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत मतभेदावरून ते राहुल यांची भेट घेणार आहेत. खास करून पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्याची तक्रार राहुल यांच्याकडे केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. परंतु, अध्यक्षपद कुणाला द्यायचं यावरून काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे या अधिवेशनातही अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही ही निवडणूक झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदावरूनही काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि वेणुगोपाल यांच्यासोबत हे दोन्ही नेते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खनिकर्म महामंडळाबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यात नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. हे पत्रं ज्या विभागाला लिहिलं त्याने खुशाल चौकशी करावी, असं राऊत यांनी म्हटलं होतं. आमदार होण्यापूर्वी माझा कोळश्याचा व्यवसाय होता. पण हे पत्र माझ्याशी संबंधित नाही, असं राऊत म्हणाले होते. त्यामुळे राऊत-पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर आली होती. तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची हायकमांडकडे मागणी केली होती. त्यातही त्यांनी ऊर्जा विभाग मिळण्याचे सूतोवाच केलं होतं. त्यावर नितीन राऊत नाराज झाले होते. आपलं पद जाऊ नये म्हणून राऊत यांनी दिल्लीवारीही केली होती. (nitin raut and balasaheb thorat reached at delhi to meet rahul gandhi)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 July 2021https://t.co/KuAA5D84u4
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 9, 2021
संबंधित बातम्या:
रेल्वे कर्मचारी आता रात्री 12 वाजेपर्यंत काम करणार, रेल्वेत दोन शिफ्ट; वाचा नवे आदेश कुणासाठी?
कराडांना मंत्रीपद म्हणजे वंजारी समाजात फूट, पंकजांना संपूर्ण खतम करण्याचा डाव!
(nitin raut and balasaheb thorat reached at delhi to meet rahul gandhi)