बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार पुन्हा एकदा संतापलेत. त्यांनी रागाच्या भरात बिहार (Bihar) विधानसभेचे सभापती विजय सिन्हा यांची सुद्धा खरडपट्टी काढली. विधानसभेत रागामुळे तीळपापड झालेले बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी सभापती सिन्हा यांना चक्क राज्य घटना पाहण्याचा सल्ला दिला. आता हे जाणून घ्या की, नीतीश कुमार यांना इतका राग का आला? बिहारमध्ये सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरूय. त्यात सोमवारी विधिमंडळाचे सत्र सुरू होताच भाजप (BJP) आमदार संजय सरावगी यांनी लखीसरायमध्ये 52 दिवसांत 9 खून झाल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांना संबंधित मंत्र्यांकडून पोलीस काय काम करतायत याचे उत्तर हवे होते. याप्रकरणी एकच गदारोळ उडाला. त्यामुळे नीतीश कुमार अतिशय नाराज झाले. त्यांनी सभागृहातच गोंधळ घालणाऱ्या प्रत्येकाची खरडपट्टी काढायलास सुरुवात केली. त्यातच सभापती विजय सिन्हाही त्यांच्या तावडीत सापडले.
काय टोचले कान?
नीतीश कुमार सभापती विजय सिन्हा यांना म्हणाले की, तुम्ही राज्य घटनेचे खुलेआम उल्लंघन करत आहात. सभागृह अशा तऱ्हेने चालणार नाही. एकच प्रकरण रोज-रोज उपस्थित करायला अर्थ नाही. यावेळी मुख्यमंत्री आणि सभापतीमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नीतीश कुमार म्हणाले की, या प्रकरणी विशेषाधिकार समिती जो अहवाल देईल त्यावर आम्ही विचार करू. आम्हीही पाहू कोणता पक्ष बरोबर आहे. व्यवस्था राज्य घटनेनुसार चालते. कोणताही क्राइम रिपोर्ट कोर्टात जातो. सभागृहात नाही. ज्याच्यावर ज्याचा अधिकार आहे, त्याला ते करू द्या. आमचे सरकार ना कोणाला वाचवते, ना कोणाला फसवते.
सभापतीही खवळले
मुख्यमंत्र्यांचा अवतार पाहून सभापतींच्याही संतापाचा पारा चढला. विजय सिन्हा म्हणाले की, जिथपर्यंत राज्य घटनेचा प्रश्न आहे, तिथे मुख्यमंत्रीजी आम्ही आपल्यापेक्षा जास्त जाणतो. मी तुमच्याकडूनच शिकतो. मात्र, आपण ज्या प्रकरणावर बोलताय, त्यावर सभागृहात तीन वेळेस गोंधळ झालाय. मी आमदारांचा कस्टोडियन आहे आणि स्वतःही लोकप्रतिनिधी आहे. मी जेव्हा मतदार संघात जातो, तेव्हा जनता प्रश्न विचारते. तुम्ही लोकांनीच मला विधानसभा अध्यक्ष केले आहे. त्यामुळे या पदाला अवमान होऊ नये.
नीतीश कुमारांचा भरोसा नाय
मुख्यमंत्री आणि सभापतींमध्ये जुंपलेल्या खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायत. नीतीश कुमारांच्या रागाचा पारा राज्यातील भाजप-जेडीयू युतीतील तणावामुळे तर चढला नाही ना, असा प्रश्नही उपस्थित होतोय. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपची युतीय. कधीकाळी जेडीयू मोठ्या भावाच्या भूमिकेत होते. आता परिस्थिती बदललीय. कमी जागा मिळूनही जेडीयूचा मुख्यमंत्री आहे. राजकीय जाणकार म्हणतात की, नीतीशकुमार मुख्यमंत्री असले तरी कमी जागा मिळाल्याचा त्यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे ते नवे पर्याय चाचपडत आहेत. संधी मिळताच ते कधीही बाजू बदलू शकतात, असा अंदाजही वर्तवला जातोय.
‘त्या’ भेटीची अजूनही चर्चा
गेल्या महिन्यात नीतीश कुमार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट झाली. यावर प्रशांत किशोर आपले जुने मित्र असल्याचे सांगत नीतीश यांनी यावर जास्त बोलणे टाळले, तर प्रशांत किशोर यांनी ही शिष्टाचार भेट असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्यात राजकीय शक्यतांवर चर्चा झाली नाही, असे होऊ शकत नाही. शिवाय नीतीश यांची पंतप्रधान होण्याची राजकीय इच्छाही लपून राहिलेली नाही. तशी संधी आलीच, तर जेडीयूकडून कधीही त्यांच्याच नावाचा विचार केला जाईल. त्यामुळेच नीतीश कुमारांच्या संतापाच्या पाऱ्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असा होरा अनेकजण मांडतायत. नीतीश कुमारांची बेचैनी ही भाजप आणि जेडीयूमधील सध्याच्या राजकीय वातावरणाची प्रतिक्रिया असल्याचा अंदाजही व्यक्त होतोय.