पाटणा | 28 जानेवारी 2024 : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांचा जुने गडी, जुनाच डाव पाहायला मिळाला आहे. नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या टर्ममधील त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चौधरी शपथ घेण्यासाठी आले असता यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी विजय सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नितीशकुमार यांनी आज सकाळीच राजभवन गाठून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा केली आणि संध्याकाळी शपथविधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण आठ मंत्री असणार आहेत. तर दोन उपमुख्यमंत्रीही असणार आहे. राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा पार पडला. हा सोहळा सुरू असतानाच जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या.
नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप नेते विनोद तावडेही उपस्थित होते. याशिवाय भाजपचे अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते. या टर्ममधील नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी टर्म आहे. या आधी त्यांची आरजेडीसोबत राज्यात सत्ता होती. दोन्ही आघाडीने 17 महिने राज्याची सत्ता सांभाळली. मात्र, राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर अचानक बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला. पक्षातील नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरल्यानंतर नितीशकुमार यांनी जेडीयूची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटना येथे झाली होती. नितीशकुमार यांनीच ही बैठक आयोजित केली होती. मात्र, इंडिया आघाडीत अनेक गोष्टी वेळेत झाल्या नाहीत. आघाडीत काही गोष्टी व्यवस्थित नव्हत्या. त्यामुळेच आघाडीतून बाहेर पडल्याचं नितीशकुमार यांचं म्हणणं आहे. ज्याने इंडिया आघाडीची पहिली बैठक आयोजित केली होती, तेच आघाडीतून बाहेर पडल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे नितीशकुमार एनडीएत आल्याने एनडीए अधिकच मजबूत झाला आहे.