‘एकवेळ मरण पत्करेन, मृत्यू मान्य, पण…’, नितीश कुमारांचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Jan 26, 2024 | 8:46 PM

बिहारच्या राजकीय वर्तुळात एकीकडे जोरदार हालचाली सुरु असताना सोशल मीडियावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नितीश कुमार यांनी भाजपवर टोकाची टीका केली होती. पण आता तेच नितीश कुमार भाजपसोबत सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

एकवेळ मरण पत्करेन, मृत्यू मान्य, पण..., नितीश कुमारांचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us on

पाटणा | 26 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार हे आरजेडीसोबत काडीमोड करुन भाजपसोबत पुन्हा नवं सरकार थाटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याची ही पहिली वेळ नाही. ते अनेकवेळा भाजप आणि आरजेडीसोबत सत्तेत राहिले आहेत. सध्या ते आरजेडीसोबत सत्तेत होते. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण अचानक त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निश्चय केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देवून सत्तापालट घडवून आणू शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्यांनी भाजपवर टीका करताना मोठं वक्तव्य केलं होतं. एकवेळ मरण पत्करेन, पण भाजपसोबत जाणार नाही, भाजपसोबत जाणं मान्य नाही, असं नितीश कुमार म्हणाले होते. पण आता ते पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

नितीश कुमार यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात भाजप नेते सम्राट चौधरी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संबंधित वक्तव्य केलं होतं. आम्ही एकवेळ मरण पत्करु, पण भाजपसोबत जाणार नाहीत, असं नितीश कुमार म्हणाले होते. त्याचवेळी भाजपच्या कार्यसमितीच्या संमेलनात नितीश कुमार यांच्यासोबत कोणताही राजकीय करार किंवा फॉर्म्युला होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर भाजप नेते सम्राट चौधरी यांनी बिहारमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करणार, असं म्हटलं होतं. त्यावर नितीश कुमार यांचं वक्तव्य समोर आलं होतं.

नितीश कुमार नेमकं काय म्हणाले होते?

“नितीश कुमार यांनी 30 जानेवारी 2023 ला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पाटणा येथील गांधी घाटावर भाजपवर सडकून टीका केली होती. एकवेळ मरुन जाणं कबूल आहे, पण भाजपसोबत जाणं कबूल नाही. सर्व गोष्टी बोगस आहे. इतकी मेहनत आणि धाडस करुन आम्ही सोबत आणलं होतं. यांच्यावर काय-काय नाही केलं गेलं, लालू प्रसाद यादव यांच्यावर केस केली गेली. आता आम्ही पुन्हा युती तोडून वेगळं झालो आहोत. आता पुन्हा काही करण्याच्या चक्करमध्ये आहे. सगळ्यांना इकडून तिकडे कसं करावं याच सगळ्या चक्करमध्ये आहोत”, असं नितीश कुमार म्हणाले होते. “आम्ही हिंदू-मुस्लीम सर्वांसाठी काम केलं. माझ्यामुळे मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं”, असं देखील नितीश कुमार म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ऑगस्ट 2022 मध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी भाजपसोत युती तोडून विरोधी पक्षांतील नेत्यांसोबत मैत्री केली होती. त्यावेळी आरजेडी पक्ष सर्वात मोठा असूनही नितीश कुमार मुख्यमंत्री बनले होते. तर तेजस्वी यादव  उपमुख्यमंत्री बनले होते. सरकार वाचवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी बराच प्रयत्न केला. काही मंत्र्यांच्या कामावर नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली तर लालू त्यांच्यावर कारवाई करायचे. पण तरीदेखील नितीश कुमार भाजपसोबत जात असल्याची माहिती आहे.