नवी दिल्ली: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. या भेटीत बीड जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज अचानक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल तासभर ही भेट चालली. त्यानंतर पंकजा यांनी मीडियाशी संवाद साधला. या भेटीत राजकीय चर्चा झाली का? असा सवाल पंकजा यांना करण्यात आला. त्यावर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
माझ्या जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन गडकरींना भेटले. प्रीतम मुंडे, आमदार माधुरी मिसाळही सोबत होत्या. विकास कामांचा विषय होता. त्यांनी आमच्या भागातील विकास कामे केली आहेत. गडकरींनी परळीला भरभरून दिलं आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. तसेच काही छोटीमोठी कामे प्रलंबित होती. ती त्यांनी लगेच मार्गी लावली. जागच्या जागीच त्यांनी कामाचा निपटारा केला. ती गडकरींची स्टाईल आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली. त्यावर बोलण्यास पंकजा यांनी नकार दिला,. मी त्या शिष्टमंडळात नव्हते. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. माझ्या कारखान्याच्या समस्या मांडायच्या असेल तर मी नक्कीच शहांची भेट घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काल मीडियाशी संवाद साधताना सहकार क्षेत्र आणि कारखानदारीबाबत भाष्य केलं होतं. ज्यात सहकार अडचणीत आहे. अनेक कारखान्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. मीही त्याचा भाग आहे. माझाही कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. शेतकऱ्यांसाठी उस गाळप करताना शेतीवर आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव वाढवतो तसेच साखरेच्या आणि इथेनॉलच्या भावाबाबत निर्णय घेतला पाहिजे. जेव्हा अॅग्रोबेस्ड उद्योग चालवताना शेतकऱ्यांना समोर ठेवून निर्णय घेतो. पण त्याचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये नफा नाही मिळाला तर तो उद्योग तोट्यात जातो. पर्यायाने शेतकरीही अडचणीत येतो. साखर कारखानदारीची परिस्थिती आज तशीच आहे. नितीन गडकरींनी आम्हाला त्यावेळी मदत केली. त्यांनी साखरेचे भाव स्थिर केले. इथेनॉलसह इतर टॅक्सबाबत चांगले निर्णय घेतले. त्यांचाही सहकारात मोठा अभ्यास आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.
संबंधित बातम्या:
वाजवा रे वाजवा! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार – राजेश टोपे
(no political discussion with nitin gadkari, says pankaja munde)