देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे, त्यांच्या सुरक्षा ताफ्यात यापुढे NSG कमांडो नसणार आहेत. यापुढे सीआरपीएफचे जवानच सुरक्षा सांभाळणार आहेत. देशातील 9 व्यक्तींच्या झेड प्लस सुरक्षेत आता एनएसजीच्या जागी सीआरपीएफचे कमांडो असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 9 VIP व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी आता CRPF वर असणार आहे. या 9 व्हीआयपींच्या सुरक्षेत आतापर्यंत NSG चे जवान तैनात होते. पण आता या सर्व 9 व्हीआयपींच्या सुरक्षेत पूर्णपणे CRPF चे जवान तैनात असणार आहेत. गृह मंत्रालयाने नुकतंच संसदेची सुरक्षेसाठी तैनात असलेली सीआरपीएफची टीम व्हिआयपींच्या सुरक्षेसाठी कार्यरत करण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे.
एनएसजीच्या ब्लॅक कॅट कमांडोकडून 9 व्हीआयपींना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जात होती. आता त्याची जबाबदारी पूर्णपणे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफला देण्यात आली आहे. दोन्ही सुरक्षा दलांची ड्युटी एक महिन्यात शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. सीआरपीएफकडे व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी 6 बटालियन होत्या. त्यानंतर आता सातवी बटालियन समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी बटालियन तीच आहे जी संसदेची सुरक्षा करत होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 व्हीआयपींपैकी दोघांना सीआरपीएफच्या एडवांस सेक्युरेटी कॉन्टॅक्ट प्रोटोकॉलचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. सीआरपीएफ आपल्या 5 व्हीआयपींसाठी अशाप्रकारचा प्रोटोकॉल वापरते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि गांधी कुटुंबाशी संबंधित 3 नेत्यांचा समावेश आहे.