पटना : कर्नाटकाच्या विधानसभेत एका आमदाराने मोबाईलवर ब्ल्यू फिल्म पाहिल्याचं प्रकरण चांगलच गाजलं होतं. मात्र, हे प्रकरण एका व्यक्ती पुरतं मर्यादित असलं तरी विधानसभेत हा प्रकार घडल्याने ते प्रकरण गंभीर होतं. आता बिहारची राजधानी असलेल्या पटनामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या एका टीव्हीवर चक्क ब्ल्यू फिल्म सुरू झाली. भर गर्दीच्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला. कुटुंबकबिल्यासह गावाला जाण्यासाठी आलेल्या या प्रवाशांना अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे मान खाली घालावी लागली.
देशातील एक महत्त्वाचं स्टेशन असलेल्या पटना रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म नंबर 10 वर सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी होती. पटना रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. त्यामुळे या स्थानकात देशभरातील एक्सप्रेस येत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकात नेहमीच गर्दी आणि वर्दळ असते. सकाळी तर ही गर्दी असतेच असते. काल सकाळी प्लॅटफॉर्मवर लावलेल्या टीव्हीसेटवर अचानक ब्ल्यू फिल्म सुरू झाली. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या प्रकाराने लोक भांबावले. काहींनी मान दुसरीकडे वळली. तर काहींनी मान खाली घातली. काहींनी गमछाने तोंड झाकले तर काही प्रवाशांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरून काढता पाय घेतला.
काही प्रवाशांनी मात्र प्रसंगावधान राखून थेट रेल्वे अधिकाऱ्यांची केबिन गाठून त्यांना सर्व माहिती दिली. त्यामुळे रेल्वे अधिकारीही हादरून गेले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ ही टीव्ही बंद केली. दरम्यान, या घटनेची आरपीएफने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आरपीएफने गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे.
या रेल्वे स्थानकात तीन मिनिट काही सेकंद ही ब्ल्यू फिल्म सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पटना आरपीएफ इन्चार्जचा फोन स्वीच ऑफ येत होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात होतं. दत्ता कम्युनिकेशन संस्थेला रेल्वे स्टेशन परिसरात सूचना देण्याची आणि टीव्हीर फोटो दाखवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवरील टीव्हीवरून काही सूचना दिल्या जात होत्या. काही फोटोही दाखवले जात होते. हे सुरू असतानाच अचानक ब्ल्यू फिल्म सुरू झाली. त्यामुळे दत्ता कम्युनिकेशनच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रवाशांनी अश्लील फिल्म सुरू असल्याची माहिती दत्ता कम्युनिकेशनला दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे फिल्म बंद केली आणि तिथून फरार झाला. या प्रकरणावर मंडल रेल प्रबंधक प्रभात कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झाला तो प्रकार लज्जास्पद आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एजन्सीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या एजन्सीला दंड ठोठावण्याचे, ब्लॅक लिस्ट करण्याचे आणि त्यांचं कंत्राट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.